मुंबई : रेल्वेगाडीचे सारस्थ करणाऱ्या लोको पायलटवर हजारो प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. एकीकडे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी, तर दुसरीकडे असुविधांमुळे भेडसावणाऱ्या समस्या अशा कात्रीत भारतीय रेल्वेचे लोको पायलट अडकले आहेत. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मिळालेल्या माहितीतून पश्चिम रेल्वेच्या वलसाड येथील २०४ लोको कॅबमध्ये स्वच्छतागृह नसल्याची बाब समोर आली आहे.

लोकसभा विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ५ जुलै रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकाला भेट देऊन भारतीय रेल्वेच्या लोको पायलटबरोबर संवाद साधला. राहुल गांधी यांनी लोको पायलटकडून त्यांची कामे आणि समस्या जाणून घेतल्या. याबाबतची ६.४९ मिनिटांची ध्वनिचित्रफीत समाज माध्यमाद्वारे देशभरात प्रसारित झाली. या ध्वनिचित्रफितीमुळे भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांतील जनसंपर्क विभागांनी लोको पायलटना सर्व सुविधा पुरवल्या जात असल्याचा दावा केला. विविध सुविधा पुरवण्यात येत असल्याचे प्रसिद्धी पत्रक माध्यमांना देण्यात आले. तसेच रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी भारतीय रेल्वेमध्ये ८१५ लोको कॅबमध्ये स्वच्छतागृह असल्याचे स्पष्ट केले. मात्र, माहिती अधिकाराद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या वलसाड येथील २०४ लोको कॅबमध्ये स्वच्छतागृह नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

हेही वाचा – मुंबई : पुलाची तुळई उभारण्यासाठी ब्लॉक

भारतातील सर्व प्रमुख रेल्वेगाड्यांपैकी राजधानी, ऑगस्ट क्रांती, सुवर्ण मंदिर, स्वराज एक्स्प्रेस पश्चिम रेल्वेवरून सुटतात. या महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांमध्ये कर्तव्यावर असलेल्या लोको पायलटसाठी स्वच्छतागृहाची सुविधा नसेल, तर भारतीय रेल्वेचे पाऊल अधोगतीकडे जात आहे. – अजय बोस, माहिती अधिकार कार्यकर्ता

हेही वाचा – दसरा मेळावासाठी केवळ ठाकरे गटाकडून अर्ज, अद्याप परवानगी नाही

माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या कल्याण इलेक्ट्रिक लोको शेडमधील २२९ पैकी ६३ लोकोमोटिव्हमध्ये वातानुकूलित यंत्रणा कार्यरत आहे. मात्र उर्वरित १६६ लोकोमोटिव्हमध्ये वातानुकूलित यंत्रणा नाही. ६३ लोकोमोटिव्हमध्ये २ लोको कॅब असून १२६ लोको कॅबमध्ये वातानुकूलित यंत्रणा आहे.