सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात डॉक्टर, तंत्रज्ञ आणि कामगारांची कमतरता असल्यामुळे त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षकांकडे  तक्रार करून व सभागृहात मुद्दा उपस्थित करूनही त्याकडे कानाडोळा करण्यात येत असल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेला अतिरिक्त आयुक्तांकडे धाव घ्यावी लागली आहे.
सांताक्रूझ आणि आसपासच्या परिसरातील गोरगरीब रुग्ण मोठय़ा संख्येने व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र या रुग्णालयात डॉक्टर, तंत्रज्ञ आणि कामगारांची संख्या कमी आहे. त्यामुळे रुग्णांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना भूलतज्ज्ञ आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे खासगी रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. शिवसेनेच्या नगरसेविका पूजा महाडेश्वर यांनी या संदर्भात वैद्यकीय अधीक्षकांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. तसेच प्रभाग समिती, पालिका सभागृहातही हा मुद्दा उपस्थित केला. परंतु अद्यापही या रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध करण्यात आलेले नाहीत.
त्यामुळे आता पूजा महाडेश्वर यांनी अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांना पत्र पाठवून रुग्णांचे गाऱ्हाणे मांडले आहे. या रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी यावे, असे साकडे त्यांनी म्हैसकर यांना पत्रात घातले आहे.