मुंबई : नाकाद्वारे देण्यात येणारी ‘इन्कोव्हॅक’ ही करोना लस आज, शुक्रवारपासून मुंबई महापालिकेतर्फे शहरातील २४ केंद्रांवर देण्यात येणार आहे. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेऊन सहा महिने किंवा अधिक काळ झालेल्या ६० वर्षे वयावरील नागरिकांना या लशीची वर्धक मात्रा घेता येणार आहे.
१६ जानेवारी २०२१ पासून देशभरात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू झाली. त्यानुसार मुंबईत प्राधान्य गटांचे आणि त्यानंतर १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे करोना लसीकरण करण्यात आले. करोना लशीची वर्धक मात्रा १० जानेवारी २०२२ पासून देण्यात येत आहे.
आता २८ एप्रिलपासून ‘इन्कोव्हॅक’ ही लस ६० वर्षे वयावरील नागरिकांना वर्धक मात्रा म्हणून देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी या लशीची वर्धक मात्रा घेता येईल. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनव्यतिरिक्त अन्य कोणत्याही लशीसाठी वर्धक मात्रा म्हणून इन्कोव्हॅक लस देता येणार नसल्याचेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
वर्धक मात्रा घेण्याचे आवाहन
मुंबई महानगर क्षेत्रातील २४ ठिकाणी ‘इन्कोव्हॅक’ लस नोंदणीद्वारे देण्यात येईल. २४ विभागांतील सर्व लसीकरण केंद्रांची नावे व पत्ते महानगरपालिकेच्या ट्वीटर खात्यावर देण्यात येणार आहेत. संबंधित पात्र मुंबईकर नागरिकांनी ही वर्धक मात्रा घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.