कोव्हीशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लशी इंजेक्शनद्वारे देण्यात येतात. त्यामुळे भारत बायोटेकने तयार केलेल्या नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या इन्कोव्हॅक लसीच्या प्रतीक्षेत अनेकजण होते. नाकावाटे देण्यात येणारी ही लस देण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली असली तरी ती फक्त खासगी रुग्णालयातच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना ही लस विकतच घ्यावी लागणार आहे. या लसीची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Nasal Vaccine म्हणजे काय? ती नक्की कशी काम करते? या बूस्टर डोसमुळे करोनाचा धोका कितपत टळणार, जाणून घ्या

केंद्र सरकारने भारत बायोटेकच्या इन्कोव्हॅक या नाकावाटे देणाऱ्या लशीला मान्यता देण्यात आली. त्यानुसार ही लस कोविन ॲपवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या तिची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यातच आता राज्य सरकारकडून ही लस उपलब्ध होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भारत बायोटेकची इन्कोव्हॅक ही लस फक्त खासगी रुग्णालयातच उपलब्ध असेल असे, राज्य आरोग्य सेवा कार्यालयाने स्पष्ट केले आहे. इन्कोव्हॅक ही लस १८ वर्ष आणि त्यावरील नागरिकांना देण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> वर्धक मात्रा घेतलेल्यांना नाकाद्वारेच्या लसीसाठी नोंदणी करता येणार?, करोना सल्लागार समितीचे प्रमुख म्हणाले…

या लसीचे दोन्ही नाकपुड्यांमध्ये प्रत्येकी चार थेंब टाकायचे आहेत. तसेच २८ दिवसांनंतर लसीची दुसरी मात्रा घ्यावी लागणार असल्याचे आरोग्य सेवा कार्यालयाचे अतिरिक्त संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी स्पष्ट केले आहे. ही लस सरकारतर्फे देण्यात येणार नसल्याने नागरिकांना ती विकत घ्यावी लागणार आहे. भारत बायोटेकच्या नेझल वॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी सप्टेंबर महिन्यात मंजुरी देण्यात आली होती. भारत बायोटेकच्या बीबीव्ही १५४ इंट्रानेझल लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडविया यांनी दिली होती. नाकावाटे दिली जाणारी ही भारताची पहिली लस आहे. भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार, ही लस साठा आणि वितरणासाठी दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानात ठेवता येते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Incovacc intranasal vaccine for covid 19 available in private hospitals mumbai zws print news zws