शिक्षक, अधिकार मंडळे यांना डावलून निर्णय; विभागात सुविधांची वानवा
नीलेश अडसूळ
मुंबई : विभागात पुरेशा सुविधा, जागा, शिक्षक नसतानाही विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाची प्रवेशक्षमता तीस टक्क्यांहून अधिक वाढवण्याचा घाट विद्यापीठाने घातला आहे. विभागातील शिक्षक, अधिकार मंडळे यांना डावलून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समोर आले आहे.
विद्यापीठातील कोणत्याही विभागाला नियोजित विद्यार्थी संख्येच्या तुलनेत १० टक्के विद्यार्थीसंख्या कुलगुरूंच्या अधिकारांखाली वाढवून दिली जाते. परंतु त्याहून अधिक विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी विभागातील शिक्षक, अभ्यास मंडळ यांच्याशी चर्चा करून अध्ययन परिषदेची मान्यता घ्यावी लागते. ही प्रक्रिया बाजूला सारून पत्रकारिता विभागाने ‘संज्ञापन आणि पत्रकारिता’ आणि ‘जनसंपर्क’ या अभ्यासक्रमांमध्ये प्रत्येकी २० विद्यार्थ्यांची वाढीव मान्यता मिळवली आहे.
या विभागात पत्रकारितेला ६० विद्यार्थ्यांची तर जनसंपर्क अभ्यासक्रमाला २० विद्यार्थ्यांची मान्यताप्राप्त क्षमता आहे. ही क्षमता दुप्पट व्हावी जेणेकरून विद्यापीठाचे उत्पन्न वाढेल अशा आशयाचे पत्र विभागप्रमुखांनी कुलगुरूंना दिले होते. तसे करणे शक्य नसल्यास प्रत्येकी वीस जागा वाढीव द्याव्यात, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली होती. या पत्रावर विद्यापीठाने प्रत्येकी २० जागा वाढवण्यास मान्यता देऊन नंतर अधिकार मंडळासमोर प्रस्ताव ठेवण्याच्या अटीवर मान्यता दिली आहे. सध्या वीस वाढीव विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा आणि त्यानंतर अभ्यास मंडळ आणि अध्ययन परिषदेची परवानगी घ्यावी असा हा प्रस्ताव आहे. प्रवेश प्रक्रियेनंतर संबंधित परिषदांची परवानगी घेण्याचे विद्यापीठाने विभागाला सांगितल्याने हा गोंधळ समोर आला.
पायाभूत सुविधांची वानवा
पत्रकारिता आणि जनसंपर्क असे दोन अभ्यासक्रम मिळून विभागात ८० विद्यार्थी एका वर्षांला शिक्षण घेतात. सध्या विभागाकडे दोन वर्ग आहेत. त्याची प्रत्यक्षात पाहणी केली असता एका वर्गात ४० विद्यार्थी सामावणेही कठीण आहे, अशा स्थितीत त्या वर्गात पत्रकारितेचे ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वीस विद्यार्थी वाढले तर त्यांची व्यवस्था कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच विद्यार्थीसंख्या वाढली म्हणजे शिक्षण आणि व्यवस्थापन यावरील ताण वाढणार आहे. त्यासाठीचे नियोजन विभागाकडे नाही. पुरेसे संगणक नाहीत. विद्यापीठात शिक्षकांची ५ पदांना मंजुरी आहे, मात्र त्यातील ३ पदांवरच पूर्णवेळ शिक्षक कार्यरत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्र मासाठी १५ विद्यार्थ्यांसाठी १ शिक्षक असणे अपेक्षित आहे. त्यानुसार वाढीव जागांना मंजुरी दिल्यास शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तरही बदलणार आहे. मान्यता मिळवताना विभागातील शिक्षकांना विचारात घेतलेले नाही, असे शिक्षकांनी सांगितले.
यंदा निकाल वाढल्याने कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये या उद्देशाने वाढीव जागा देण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांकडून मागणी वाढत असल्याने विभागाने वाढीव जागांची मागणी केली होती. त्यामुळे दोन्ही अभ्यासक्रमांना प्रत्येकी २० जागा वाढवून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार विभागाला सर्व पायाभूत सुविधा पुरवण्यात येतील.
– लीलाधर बनसोड, जनसंपर्क अधिकारी, मुंबई विद्यापीठ
शिक्षकाचे पत्र
विभागाच्या मनमानी विस्तारासंदर्भात विभागातील प्राध्यापकांनी विद्यापीठाला पत्र पाठवले आहे. विभागातील उपलब्ध सुविधा, शिक्षण आणि व्यवस्थापनावरील ताण स्पष्ट केला आहे. अचानक विद्यार्थीसंख्या वाढल्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणी, प्रवेश आणि नोंदणी प्रक्रियेतील अडचणीही पत्रात अधोरेखित केल्या आहेत.
कोणताही विभाग स्वत:च्या विस्तारासाठी प्रयत्न करत असतो. या प्रस्तावाला थेट कुलगुरूंनी मान्यता दिल्याने त्यापुढे कोणत्याही परिषदेची परवानगी घेण्याची गरज नसते. हा निर्णय विद्यार्थी हिताचा आहे. ज्यांना यावर आक्षेप आहे त्यांनी विभागप्रमुख म्हणून माझ्याशी संपर्क साधावा. सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. प्रत्यक्ष शिक्षण सुरू झाल्यास विद्यापीठ आम्हाला वाढीव जागा देईल.
– सुंदर राजदीप, विभागप्रमुख, पत्रकारिता विभाग