मुंबई : ऑगस्टमध्ये पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने लेप्टो, गॅस्ट्रो या साथीच्या आजारांमध्ये घट झाली असली तरी हिवताप, डेंग्यू, स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत वाढ कायम आहे. त्यामुळे मुंबईमध्ये अद्यापही हिवताप व डेंग्यूचा धोका अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑगस्टमध्ये मलेरियाच्या १०८० तर डेंग्यूच्या ९९९ रुग्णांची नोंद झाली आहे. सप्टेंबरमधील पहिल्या तीन दिवसांत गॅस्टो ७४, मलेरिया ५७ आणि डेंग्यू ३२ रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. एडिस डासाच्या उत्पत्तीसाठी हे वातावरण पोषक असते. त्यामुळे डेंग्यू, हिवताप आणि चिकनगुनिया रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यानुसार जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये हिवताप, डेंग्यू व चिकुनगुनिया रुग्णसंख्येत प्रमाणात वाढ झाली आहे. सप्टेंबरच्या तीन दिवसांचा साथीच्या आजारांचा अहवाल मुंबई महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आला आहे. मुंबईत ऑगस्टमध्ये हेपेटायटिसचे १०३, गॅस्ट्रोचे ९७८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर जुलैमध्ये हेपेटायटिसचे १४४ तर गॅस्ट्रोच्या १७६७ रुग्णांची नोंद झाली होती. सप्टेंबर महिन्यातील पहिल्या तीन दिवसांत हेपेटायटिसचे १३ रुग्ण सापडले आहेत.