मुंबई : राज्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांच्या ‘कमिशन’मध्ये प्रतिक्विंटल २० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच १० जीवनावश्यक वस्तूंच्या शिधावाटप दुकानातून विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.

‘शिधावाटप यंत्रणेसंदर्भातील प्रलंबित प्रकरणांवर तातडीने सुनावणी घेऊन ती निकाली काढण्यात येतील. गावखेड्यातल्या प्रत्येक शिधापत्रिका कार्डधारकाला नियोजनानुसार धान्यवाटप झाले पाहिजे, या कार्यवाहीत हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, ’ असे निर्देश पवार यांनी बैठकीत दिले. पवार यांच्या कार्यालयात अन्न व नागरी पुरवठा विभागाची सद्यास्थिती, भविष्यातील वाटचालीबाबतचे सादरीकरण करण्यात आले.

मुंबई, ठाण्यात शिधा कार्यालयांची पुनर्रचना

मुंबई आणि ठाण्यातील शिधावाटप कार्यालयांची पुनर्रचना करून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक कार्यालय असेल. १९८० मध्ये शिधावाटप कार्यालयांची पुनर्रचना झाली होती. नव्या पुनर्रचनेनंतर मुंबई व ठाण्यात एक परिमंडल कार्यालय आणि ५ नवीन शिधावाटप कार्यालये तयार होतील. यातून मुंबई आणि ठाणे परिसरातील नागरी पुरवठा यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.