मुंबई : राज्यात अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी दंगलीच्या घटना घडल्या आहेत, दंगलखोरांवर पोलीस कारवाई करीत नाहीत, बघ्याची भूमिका घेतात, त्यामुळे सामाजिक सौहार्द बिघडविण्यामागे कोणाचे कटकारस्थान आहे का, अशी शंका येते, अशा शब्दांत विरोधी पक्षाने विधान परिषदेत सरकारवर हल्ला चढविला. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भाई जगताप, एकनाथ खडसे आदी सदस्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात व देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचा आरोप दानवे यांनी केला.
‘ रश्मी शुक्लांनी कोणते संभाषण ऐकले?’
एकनाथ खडसे अप्पर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी केलेले फोन टॅपिंग प्रकरण काढून, देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याची संधी सोडली नाही. शुक्ला यांनी ८४ दिवस माझे फोन टॅप केले. त्याची चौकशी झाली, परंतु त्यातून काय पुढे आले ते मला समजले पाहिजे, असे ते म्हणाले. माझे फोन टॅप का केले, मी देशद्रोही आहे का, त्यांनी माझे कोणते संभाषण ऐकले, ते मला समजले पाहिजे, तो माझा अधिकार आहे, देवेंद्र फडणवीस यांनी त्याची उत्तरे दिली पाहिजेत, अशी मागणी खडसे यांनी केली.
खडसेंचा टीकेचा भडिमार
एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर विशेषत: गृह, आदिवासी आणि बांधकाम विभागांवर आरोपांचा भडिमार केला. रस्त्यांची कामे न करताच बिले काढली जातात, असा आरोप त्यांनी केला. ११ हजार कोटी रुपये कंत्राटदारांचे देणे थकीत आहे, मग सहा लाख कोटी रुपये कर्ज कशासाठी काढले, हा पैसा जातो कुठे, असा सवाल त्यांनी केला.
विद्यापीठांमधील ३०५६ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण
राज्यातील विद्यापीठांअंतर्गत ३०५६ रिक्त पदे भरण्यात आली आहेत आणि स्वायत्त महाविद्यालयांतील ४०० रिक्त जागाही भरल्या जातील, असे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले. पाटील यांनी राष्ट्रीय विधि विद्यापीठ सुधारणा विधेयक विधानसभेत मांडले.
डॉ. पल्लवी सापळे यांच्यावरील आरोपांची चौकशी
मुंबई : जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठता डॉ. पल्लवी सापळे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांनी विधानसभेत केली असता त्या आरोपांची चौकशी करण्याचे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. डॉ. सापळे मिरज येथे अधिष्ठाता असताना गरिबांनी रक्तदान केलेल्या रक्तातील प्लझमा विकून त्या पैशातून आपल्या आईंच्या नावाने १३ लाख रुपयांची रुग्णवाहिका दान दिल्याचे दाखविले व तसा कार्यक्रम आयोजित केला होता. हा गैरव्यवहार त्यांनी डॉ. केसरखाने यांच्या मदतीने घडवून आणला. रुग्णांचे रक्त स्वार्थासाठी विकणाऱ्या डॉ. सापळे यांची चौकशी करण्याची मागणी जाधव यांनी केली.
श्रीमती विनिता सिंघल जेजेच्या कोविडच्या अधिकारी असताना डॉ. पल्लवी सापळे यांच्या गैरव्यवहाराची चौकशी करून त्यांना निलंबित करून त्यांची खुली चौकशी करण्याची शिफारस सचिव विनिता सिंघल यांनी शासनाला केली होती. मिरज येथे अधिष्ठाता असताना वाहनावर महिना एक लाखाच्या वर खर्च करत आहेत. हा खर्च ७०-८० लाखांवर गेलेला आहे. या खर्चात १० गाडय़ा विकत घेता आल्या असत्या. तो पैसा वसूल करावा. औषधाचे बिले, यंत्रसामुग्रीची बिले तसेच बांधकामाच्या बिलांवर ५-१० टक्के घेतल्याशिवाय त्या सह्याच करत नाहीत. जेजे रुग्णालयात खूप औषधे नाहीत. चाचण्यांसाठी बाहेर पाठवल्या जातात. गरिबांच्या शस्त्रक्रिया यामुळे होत नाहीत. याची चौकशी करण्याची मागणी जाधव यांनी केली.