मुंबई : बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमण वाढत असून बांधकाम व्यावसायिकांनी उद्यानातील ९२०० चौरस मीटर जागेवर अतिक्रमण केले असून अतिक्रमणामुळे उद्यानातील क्षेत्र झपाट्याने कमी होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आला आहे.बांधकाम व्यावसायिकांना उद्यानात पालिकेकडून मर्यादित जागा देण्यात आली आहे. त्यावरच बांधकाम प्रकल्पाला मंजुरी दिली जाते. मात्र, उद्यानात बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरणासाठी काम करणाऱ्या वनशक्ती संस्थेने हरित लवादाकडे याबाबत तक्रार केली. हरित लवादाने घटनास्थळी भेट देऊन अहवाल सादर करण्यासाठी एक समिती नेमली आहे.
या बांधकाम व्यावसायिकांनी ओशिवरा आणि पोईसर या दोन नद्यांचे उगमस्थान असलेल्या डोंगरामध्ये खोदकाम करून नदीच्या पात्राचे सपाटीकरण करण्यास सुरुवात केली आहे. तसेच एका बाधकाम व्यावसायिकाला दिंडोशी टेकडीवर बांधकाम करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे तेथील अनेक झाडे तोडण्यात आली आहेत. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पालिकेने बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वनविभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.