मुंबई : राज्यात कीटकजन्य, जलजन्य, प्राणीजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक प्रभावी उपाययोजनांसाठी तसेच विविध विभागांच्या समन्वयासाठी पुनर्गठित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समितीची आढावा बैठक बुधवारी दुरभाष्य प्रणालीद्वारे पार पडली. संसर्गजन्य आजारावर प्रतिबंध व नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व विभागांचा सहभाग व समन्वय आवश्यक आहे. त्यानुसार सर्व विभागांना त्यांची कामे आणि भूमिका या बैठकीत विशद करण्यात आली.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि अमगोथू श्रीरंगा नाईक, आयुक्त, आरोग्य सेवा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ही बैठक पार पडली. नगरविकास विभाग, ग्रामीण विकास विभाग, गृह निर्माण विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, शिक्षण विभाग-माध्यमिक, उच्च माध्यमिक, महिला व बालविकास विभाग, पशुवैद्यकीय विभाग, अन्न व औंषध प्रशासन विभाग, राष्ट्रीय विषाणू परिषद, पुणे आदी संबंधित ३२ विभागांचे सदस्य बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक विभागाने आपआपली भूमिका समन्वयाने पार पाडावी यासाठी प्रत्येक विभागाने करावयाची कार्यवाही याविषयी विभागवार माहिती देण्यात आली. सहसंचालक राधाकिशन पवार यांनी राज्यातील सध्याच्या संसर्गजन्य आजारांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन समितीची कार्यपद्धती व उद्दिष्ट्ये याबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सर्व कीटकजन्य, प्राणीजन्य व जलजन्य आजारांची आणि राज्याच्या वस्तुस्थितीचे सर्व उपस्थितांना अवलोकनाकरिता सादरीकरण केले.
हेही वाचा >>>वर्सोवा खाडी – मढ यांना जोडणाऱ्या प्रकल्पाच्या खर्चात ९५ टक्क्यांनी वाढ; विरोधी पक्ष नेता रवी राजा यांचा आरोप
आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक यांनी शहरी विभागाकरिता ‘बाय लॉज’ निर्माण करणे गरजेचे असल्याचे यावेळी सूचित केले. अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी सध्याच्या सणासुदीच्या व येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर सर्वांनी दक्ष रहावे तसेच आजारांबाबत जनतेमध्ये घबरहाट निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीत राज्यातील साथरोग परिस्थितीचे विश्लेषण करुन साथरोग उद्भवाची कारणमीमांसा तसेच करावयाच्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजनांची रूपरेषा ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली. राज्यातील सध्याच्या साथरोग नियंत्रण व्यवस्थेचा अभ्यास करुन त्यात आवश्यक बदल सुचविणे, महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमधील साथरोग परिस्थितीचा तुलनात्मक अभ्यास करुन त्या अनुषंगाने आंतरराज्य समन्वयाचे मुद्दे निश्चित करणे, राज्य आणि केंद्रीय स्तरावरील मार्गदर्शक सूचनांमध्ये समन्वय करणे, साथरोग निवारणासाठी इतर विभागांशी सल्लामसलत करून साथरोगामध्ये प्रत्येक विभागाची भूमिका निश्चित करून त्याप्रमाणे कार्यवाही करणे, राज्यस्तरीय प्राणीजन्य आजार समित्यांकडील विषयांबाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेणे, अशा सूचना आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव म्हैसकर यांनी बैठकीत दिल्या.
हेही वाचा >>>नीरव मोदी गैरव्यवहार प्रकरण; ईडीकडून २९ कोटींच्या मालमत्तांवर टाच
महाराष्ट्राची भौगोलिक विविधता, औद्योगीकरण, शहरीकरण, वातावरणातील बदल या कारणामुळे विविध साथरोगांच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोविड आजाराबरोबर इतर साथीचे आजार हिवताप, डेंगी, झिका, इन्फ्लुएंझा, कावीळ, कॉलरा, इन्फ्लूएंझा ए, कॉलरा, टायफॉइड, तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस, स्क्रप टायफस, हिपॅटायटीस “ए”, “ई”, लेप्टोस्पायरोसिस जे ई, चंडिपूरा हे आजार, लस प्रतिबंधक रोग, गोवर, गालगुंड, घटसर्प, धनुर्वात, पोलिओ, रेबीस, पेर्दुसिस या सारखे जुने साथीचे आजार तर नव्याने उद्भवणारे इबोला, केएफडी, निपाह आणि झिका सारखे आजार चे रुग्ण वेळोवेळी डोके वर काढत असतात. त्यामुळे या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या त्या विभागाला मार्गदर्शक सूचना या बैठकीत देण्यात आल्या.