मुंबई : देशातून सेंद्रीय अन्न पदार्थांच्या निर्यातीत गतवर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षांत डिसेंबरअखेर ४४७७.३ लाख डॉलर मूल्याच्या २,६३,०५०.११ टन सेंद्नीय अन्न पदार्थांची निर्यात झाली आहे. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षांत डिसेंबरअखेर ४,४७७.३ लाख डॉलर मूल्याच्या २,६३,०५०.११ टन अन्न पदार्थांची निर्यात झाली आहे. गत वर्षी (२०२३-२४) मध्ये ४,९४८ लाख डॉलर मूल्याच्या २,६१,०२९ टन अन्न पदार्थांची निर्यात झाली आहे. देशातून २०२० – २१ मध्ये उच्चांकी १०,४०९.५ लाख डॉलर मूल्याच्या ८,८८,१७९.६८ टन सेंद्रीय उत्पादनांची निर्यात झाली होती. ही निर्यात कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न पदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाच्या (अपेडा) माध्यमातून करण्यात आली आहे.
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने सेंद्रिय उत्पादनांच्या उत्पादनासाठी उद्योगांना कोणत्याही विशिष्ट प्रोत्साहनपर निधीची तरतूद केलेली नाही. मात्र, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या अपेडाकडून निर्यातदारांना निर्यात पायाभूत सुविधांचा विकास, गुणवत्ता विकासासाठी निधी दिला जातो. बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. शिवाय अपेडाकडून राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत सेंद्रिय अन्न पदार्थांच्या उत्पादन आणि निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले जाते. देशभरात सेंद्रिय खाद्य पदार्थ उत्पादन केंद्रांची संख्या १०१६ इतकी आहे.
हेही वाचा :दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडणार ? जाणून घ्या, हवामान विभागाचा पावसाचा, थंडीचा अंदाज
सेंद्रीय उत्पादनात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
सेंद्रीय अन्न पदार्थांच्या उत्पादनात कर्नाटक आघाडीवर आहे. कर्नाटकात १२७ प्रक्रिया केंद्रे आहेत. त्या खालोखाल गुजरातमध्ये १२२ आणि महाराष्ट्रात ११३, तमिळनाडूत ८८ आणि पश्चिम बंगालमध्ये ८३ प्रक्रिया केंद्रे आहेत. देशातील ज्या राज्यातील बंदरावरून निर्यात झाली आहे, त्याच राज्यातून निर्यात झाली, असे समजले जाते. त्यामुळे राज्यनिहाय सेंद्रीय अन्न पदार्थांचे उत्पादन आणि निर्यातीची आकडेवारी मिळत नाही.