मुंबई : मागील दोन दिवसांच्या तुलनेत गुरुवारी मुंबईत उन्हाचा दाह अधिक जाणवला. पुढील दोन दिवस मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा चढा राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात गुरुवारी सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली . तेथे ३६.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.सध्या शहरातील कमाल व किमान तापमानात सतत बदल होत आहे. पहाटे हवेत गारवा जाणवतो तर दुपारी उन्हाचा चटका सोसावा लागतो.

 मुंबईत गुरुवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३६.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ केंद्रात गुरुवारी २.२ अंश सेल्सिअसने अधिक तापमान नोंदले गेले. वातावरणात गुरुवारी शुष्क, गरम झाळांचे प्रमाण अधिक होते. तसेच उष्णताही दीर्घकाळ होती. संध्याकाळी सूर्यास्तानंतरही वातावरणातील उष्णता मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरत होती. तापमानाचा वाढलेला पारा, त्यात भर म्हणजे हवेच्या गुणवत्तेचा घसरलेला दर्जा यामुळे नागरिकांना गुरुवारी उकाडा आणि दूषित हवामानाचा सामना करावा लागला.गेले काही दिवस तापमानाचा पारा चढा असल्याने मुंबईकरांना यंदा ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा अधिक त्रास जाणवला.दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबईतील कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. मोसमी पावसाचा परतीचा प्रवास पूर्ण झाला आहे. यामुळे आर्द्रता वाढल्याने पुढील दोन दिवस अस्वस्थता जाणवण्याची शक्यात आहे.