मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्राबाहेर लागलेल्या रांगांचा अनुभव लक्षात घेऊन येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक मतदान केंद्राच्या (बूथ) ठिकाणी पूर्वी असलेली सरासरी १५०० मतदारांची संख्या आता सरासरी १००० ते १२०० इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान केंद्रांच्या संख्येत २१८ ने वाढ झाली असून मतदान केंद्रांची संख्या आता १० हजार १११ वर पोहोचली आहे.

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार, मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्टीकोनातून मुंबईतील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. या सुसूत्रीकरण कार्यक्रमामुळे बृहन्मुंबई क्षेत्रातील मतदान केंद्रांची संख्या आता १० हजार १११ इतकी झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान केंद्रांच्या संख्येत २१८ ने वाढ झाली आहे. परिणामी, मतदानाचे प्रमाण आणि वेग वाढण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात म्हाडाला मिळणार सुमारे १४०० घरे ?

भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशांनुसार, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन तयारी करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. सुसूत्रीकरण करताना प्रामुख्याने एका मतदान केंद्रावर सरासरी १२०० पर्यंत मतदारसंख्या राहील, हे सूत्र लक्षात ठेवून मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. तर, अधिक मतदान केंद्र असणाऱ्या एकाच ठिकाणावरील मतदान केंद्रांचे विक्रेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या वाढली आहे.

मतदान केंद्रांबाबत माहिती देण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत मुंबई महानगरपालिका मुख्यालयात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, संबंधित अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा – पत्राचाळीतील २,३९८ घरांच्या बांधकामाच्या निविदेला मुदतवाढ, अपेक्षित प्रतिसादाअभावी मुंबई मंडळाचा निर्णय

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये एकूण २ हजार ५०९ मतदान केंद्रे होती. तर, मुंबई उपनगर जिल्ह्यात ही संख्या ७ हजार ३८४ इतकी होती. सुसूत्रीकरण कार्यक्रमामुळे मतदान केंद्रांची संख्या अनुक्रमे २ हजार ५३७ आणि ७ हजार ५७४ म्हणजेच संपूर्ण बृहन्मुंबई क्षेत्रात (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे) १० हजार १११ इतकी झाली आहे.

सुसूत्रीकरण केल्याने मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये झालेल्या नवीन बदलांसंदर्भात मतदारांना माहिती देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ ही जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत मतदार नोंदणी अधिकारी मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्रांच्या ठिकाणामध्ये झालेल्या बदलांची माहिती देणार आहेत.