पाचऐवजी सहा दिवस शाळा चालविणे बंधनकारक केल्यास काही शाळांच्या पालकांना एक दिवसाच्या बसभाडय़ाचा वाढीव बोजा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. शाळा बसचालक संघटनेने आत्ताच या संबंधात इशारा दिला आहे.
आठवडय़ाला एक दिवस वाढल्याने आर्थिक भरुदड पालकांवर बसभाडय़ाच्या रूपाने येणार आहे. अर्थात त्याचा फटका सरसकट सर्व शाळांना बसणार नाही. कारण, अनेक शाळा, खास करून मराठी माध्यमाच्या शाळा सहा दिवसांचा आठवडा गृहीत धरूनच चालविल्या जातात. पाच दिवसांचा आठवडा सीबीएसई, आयसीएसईसारख्या केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांबरोबर राज्य शिक्षण मंडळाच्या काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येच राबविला जातो. त्यामुळे याच शाळांना या वाढीव भाडय़ाचा फटका सहन करावा लागणार आहे. शाळेचे बसचालक पालकांकडून वर्षभराचे बसभाडे घेतात. हे भाडे सध्याच्या १८० दिवसांसाठी जो खर्च येतो त्या तुलनेत विभागलेले असते. पण, ‘शाळा २००-२२० दिवसांसाठी भरली तर जादाच्या २० ते ४० दिवसांचा खर्च आम्हाला पालकांकडून घ्यावा लागेल. त्यामुळे, पालकांकडून साधारणपणे एका महिन्याचे जादाचे भाडे घ्यावे लागणार आहे,’ अशी प्रतिक्रिया शाळा बसचालक संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग व्यक्त केली.

Story img Loader