मुंबई : राज्यामध्ये करोना रुग्णांच्या संख्येत मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये दुपटीने वाढ झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली. मात्र दुसऱ्या आठवड्याच्या तुलनेत तिसऱ्या आठवड्यामध्ये करोना रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली असून, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात १६ ते २४ मार्चदरम्यान तब्बल २,२११ करोना रुग्ण सापडले आहेत.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून करोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली असून मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये ३५५ करोनाचे रुग्ण सापडले, तर दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यात दुपटीने वाढ झाली. राज्यात १५ मार्चपर्यंत ७५४ रुग्ण सापडले होते. यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाने राज्याला सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर करोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात १६ ते २४ मार्चदरम्यान तब्बल २,२११ करोना रुग्ण सापडले आहेत. ही वाढ मार्चच्या दुसऱ्या आठवड्याच्या तुलनेत तिपटीहून अधिक आहे. या कालावधीत प्रत्येक दिवशीची रुग्ण संख्या २०० पेक्षा अधिक आहे. २२ व २४ मार्च रोजी करोना रुग्णांच्या संख्येने ३०० चा टप्पा ओलांडला आहे. यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती १७६३ इतकी झाली आहे.
हेही वाचा >>> मुंबईतील पाच शवागृहात लवकरच होणार डॉक्टरांची नियुक्ती
मार्चमध्ये ११ जणांचा मृत्यू
मार्चच्या पहिल्या १५ दिवसांमध्ये करोनामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्रा त्यानंतर १६ ते २४ मार्च दरम्यान नऊ दिवसांमध्ये सात जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. १७ मार्च, १८ मार्च, २१ मार्च आणि २२ मार्च रोजी अनुक्रमे प्रत्येकी एका रुग्णाचा तर २४ मार्चला तीन रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला.
करोना लसीकरणाला दीड वर्षे झाली अ्सून शरीरात निर्माण झालेल्या प्रतिपिंडाचा प्रभाव कमी झाल्याची शक्यता आहे. त्यातच करोनाच्या नवा उपप्रकारमुळे करोनाबाधित रुग्णच्या संख्येत वाढ होऊ शकते.
– डॉ. भरत जगियासी, सचिव, इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन, मुंबई</p>
करोना रुग्णसंख्या
१६ मार्च – २४६
१७ मार्च – १९७ – १ (मृत्यू)
१८ मार्च – २४९ – १ (मृत्यू)
१९ मार्च – २३६
२० मार्च – १२८
२१ मार्च – २८० – १ (मृत्यू)
२२ मार्च – ३३४ – १ (मृत्यू)
२३ मार्च – १९८
२४ मार्च – ३४३ – ३ (मृत्यू)
एकूण – २२११