अक्षय मांडवकर

जखमी माकडांच्या संख्येत वाढ; वनविभागाचे उपचार केंद्रच नाही

वनविभागाने गेल्या सात महिन्यांत मानवी वसाहतीत शिरून उच्छाद मांडणाऱ्या सुमारे ६१ माकडांना जेरबंद केले आहे. हरितक्षेत्रापासून दूर असलेल्या दक्षिण आणि मध्य मुंबईतही माकडांचा सुळसुळाट वाढला आहे. स्थानिक पालिका आणि वनविभागातील समन्वयाअभावी त्यांच्या बचावकार्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे जखमी माकडांचे प्रमाण वाढले आहे. अशा माकडांवर उपचार करण्यासाठी शहरात वनविभाग संचलित उपचार केंद्रही नसल्याने उपचार मिळण्यास विलंब होत आहे.

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पश्चिम आणि पूर्व हद्दीलगतच्या परिसरांमध्ये पूर्वीपासून माकडांचा वावर आहे. मुलुंड, भांडुप, बोरिवली, मालाड, कांदिवली, गोरेगाव या परिसरांतील रहिवासी संकुलांमध्ये वरचेवर माकडांचा वावर असतो. बोनेट, ग्रे लंगुर, ब्लॅक फेस लंगुर या प्रजातींची माकडे शहरी भागांत आढळतात. मात्र आता दादर, प्रभादेवी, नरिमन पॉइंट, मुंबई सेंट्रल, जुहू चौपाटी या विभागांमध्ये उच्छाद मांडणाऱ्या माकडांच्या बंदोबस्तासाठी वन्यजीव बचाव कार्यकर्त्यांना पाचारण्यात येत आहे.

नागरी वसाहतींमध्ये शिरल्याने जखमी होणाऱ्या माकडांची संख्या अधिक आहे. दोन दिवसांपूर्वी ‘रॉ’ या संस्थेला एकाच दिवशी मुंबईतील वेगवेगळ्या रहिवासी संकुलांमधून पाच माकडे गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत आढळली. ही माकडे इमारतीवरून पडल्यामुळे आणि विजेच्या धक्क्याने जखमी झाल्याचे ‘रॉ’चे प्रमुख आणि ठाण्याचे मानद वन्यजीवरक्षक पवन शर्मा यांनी सांगितले.

शहरी भागांमध्ये फि रणाऱ्या मदारींच्या हातून माकडे सुटल्यानंतर ती नागरी वसाहतींमध्ये अन्नाच्या शोधार्थ भटकत राहतात. अशा वेळी मानवाशी संघर्ष झाल्याने किंवा अपघाताने त्यांना दुखापती होत असल्याची माहिती मुंबई शहराचे मानद वन्यजीवरक्षक सुनिश कुंजू यांनी दिली.

वनविभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार मुंबई वनपरिक्षेत्रातून एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या आर्थिक वर्षांत ८१ माकडांना पकडण्यात आले होते. तर ही संख्या एप्रिल २०१८ पासून आजतागायत ६१ एवढी आहे. बऱ्याचदा स्थानिक वन्यजीव बचाव संस्थेच्या मदतीने माकडांना पकडून त्यांना पुन्हा सोडण्याचे काम केले जाते. त्यामुळे  या संख्येत वाढ होण्याची शक्यता मुंबई वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी वर्तवली. मुंबईत माकड पकडण्याच्या घटना सर्वाधिक होत असल्याचे कुंजू यांनी सांगितले.

तारांमध्ये अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करण्याचे काम बऱ्याचदा अग्निशमन दल करते. त्यामुळे हरितक्षेत्रापासून दूर असलेल्या भागांमध्ये माक डांचा उच्छाद वाढल्यानंतर रहिवासी महापालिका किंवा अग्निशमन दलाशी संपर्क साधतात. मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर रहिवाशांची पंचाईत होते. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत माकडांच्या सर्व प्रजाती दुसऱ्या श्रेणीत संरक्षित आहेत. त्यामुळे माकडांचे बचाव कार्य नियमानुसार होण्याकरिता स्थानिक स्वराज संस्था आणि वनविभागामध्ये समन्वय असणे आवश्यक असल्याचे कुंजू यांनी सांगितले. सध्या अस्तिवात असलेली माकड बचावाची प्रमाणभूत कार्यपद्धती (एसओपी ) जुनी असून त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याने नवीन कार्यपद्धती तयार करणे गरजेचे असल्याचे कुं जू म्हणाले.

जागेअभावी पुण्याला रवानगी

बचाव कार्यादरम्यान जेरबंद के लेल्या माकडांना ठेवण्यासाठी वनविभागाकडे जागेची कमतरता आहे. त्यामुळे जखमी अवस्थेत सापडलेल्या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी शहरात वनविभागाचे उपचार केंद्र नसल्याचे पवन शर्मा यांनी अधोरेखित केले. त्यामुळे  बचाव कार्यकर्त्यांना त्यांच्या संस्थेची संबंधित असलेल्या पशुवैद्यकाकडे जाऊन प्राण्यांवर उपचार करावे लागतात. अशा परिस्थितीत बऱ्याचदा जखमी माकडांची रवानगी पुण्याच्या कात्रज येथील पशू-पक्षी अनाथालयामध्ये केली जाते. जखमी वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी वनविभागातर्फे शिळफाटा येथे अनाथालय उभारण्यात येत आहे.

Story img Loader