मुंबई : राज्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, मागील १५ दिवसांमध्ये राज्यात करोनाचे ९०० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. राज्यात अचानक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नागरिकांचा मुखपट्टीच्या वापरण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे औषधाच्या दुकानांमध्ये मुखपट्टीच्या मागणीत वाढ झाली असून दिवसाला २० ते २५ मुखपट्ट्यांची विक्री होत आहे. आठवड्याभरात १०० हून अधिक मुखपट्ट्यांची विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
मुंबईमध्ये थंडीबरोबरच प्रदूषण वाढत असल्याने सर्दी, खोकला यांसारखे आजार बळावू लागले आहेत. त्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सुरुवातीला दररोज साधारण ४ ते ५ मुखपट्ट्यांची विक्री होत होती. ‘वापरा आणि फेकून द्या’ अशा प्रकारच्या त्रिस्तरीय मुखपट्टीचा वापर नागरिक करीत आहेत. मात्र १५ डिसेंबरपासून करोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होण्यास सुरुवात झाली. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. करोनापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी मुखपट्टीचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे औषधाच्या दुकानांमधील मुखपट्टीच्या विक्रीमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यामध्ये सुमारे एक लाख औषधाची दुकाने आहेत. या सर्व दुकानांमध्ये मुखपट्टीची मागणी वाढली आहे. डिसेंबरपूर्वी औषध विक्रेत्यांकडे मुखपट्टीसाठी मोजकी मागणी येत होती. मात्र या महिन्यांमध्ये मागणीत पाच ते सहा टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती औषध वितरकांची संघटना असलेल्या ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी दिली.
हेही वाचा… प्लाझालगतचा पदपथ पुन्हा अस्वच्छ; घनकचरा विभागाची भाजी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई
डिसेंबरच्या सुरूवातीला दरदिवशी तीन ते चार मुखपट्ट्यांची विक्री हाेत होती. मात्र करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागताच मागील १० दिवसांपासून प्रतिदिन ३० ते ४० मुखपट्ट्यांची विक्री होत आहे. करोनापासून बचाव करण्यासाठी त्रिस्तरीय मुखपट्टीच्या वापराकडे नागरिकांचा कल वाढत आहे, असे जे.जे. रुग्णालयासमोरील एका औषध विक्रेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.
हेही वाचा… आरोग्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही ‘वॉर रूम’ कागदावरच!
करोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाल्यापासून सूती आणि त्रिस्तरीय मुखपट्टीच्या मागणीत वाढ झाली आहे. यापूर्वी दिवसाला साधारणपणे चार मुखपट्ट्या, तर महिनाभरात १०० च्या आसपास मुखपट्ट्यांची विक्री होत होती. परंतु डिसेंबरमध्ये दर आठवड्याला १०० हून अधिक मुखपट्ट्यांची विक्री होत आहे, अशी माहिती विक्रोळीतील औषध विक्रेता मुकेश परिहार यांनी दिली. प्रदूषण व करोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुखपट्टीच्या मागणीत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.