मुंबई : सागरी किनारा मार्गावर पादचाऱ्यांना प्रवेश नसला तरी चोरांमुळे सध्या मुंबई महापालिका प्रशासन व कंत्राटदार हैराण झाले आहेत. या मार्गावर विजेच्या खांबांमधील तांब्याच्या तारा चोरून नेणाऱ्या चोरांचा उपद्रव वाढला आहे. पालिकेच्या कंत्राटदाराने याप्रकरणी पोलीस ठाण्यात पाच ते सहा तक्रारी केल्या आहेत. मात्र अद्याप चोरांचा बंदोबस्त होऊ शकलेला नाही.

सागरी किनारा मार्ग हा नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. या मार्गावरील वाहनांचा वेग, डांबराचे पट्टे, धनदांडग्यांच्या वाहनांची शर्यत अशा वेगवेगळ्या कारणांमुळे सागरी मार्ग कायम चर्चेत असतो. सध्या या मार्गावर चोरांनी उच्छाद मांडला आहे. हा मार्ग सर्व बाजूने खुला असल्यामुळे तेथे चोरांचा वावर वाढला आहे. या मार्गावर विशेषतः उड्डाणपुलांवर चोरीच्या घटना घडत असल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या मार्गावरील लव्हग्रोव्ह उड्डाणपूल, हाजीअली उड्डाणपूल येथे चोरीच्या घटना घडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले

या उड्डाणपुलावरील विजेच्या खांबांमधील तांब्याच्या तारा चोरण्याच्या घटना वाढल्या आहेत. खांबाच्या खालचे सिमेंट काँक्रीट तोडून तारा बाहेर काढल्या जातात. त्यामुळे उड्डाणपुलावरील दिवे अनेकदा बंद पडतात. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात पोलीस ठाण्यात पाच ते सहा तक्रारी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत मुंबईतील अन्य ठिकाणच्या रस्त्यावरील लोखंडी ग्रील, मॅनहोलची झाकणे चोरीला जात होती. आता सागरी किनारा मार्गावरही चोरी होऊ लागल्याने पालिका यंत्रणा त्रस्त झाली आहे.

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरीसेतूच्या वरळी टोकापर्यंत १०.५८ किलोमीटर लांबीचा सागरी किनारा मार्ग आहे. सागरी किनारा प्रकल्प आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू यांना जोडणाऱ्या पुलाचे प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर २७ जानेवारीपासून हा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाला. मात्र प्रकल्पालगतची अनेक कामे अजून बाकी आहेत. त्यामुळे सागरी किनारा मार्ग केवळ सकाळी ७ ते मध्यरात्री १२ पर्यंत वाहतुकीसाठी खुला असतो. त्यानंतर मध्यरात्री या मार्गावर इतर कामे सुरू असतात.

दरम्यान, पालिकेने या मार्गावरील बोगद्यामध्ये प्रत्येक १०० मीटर अंतरावर सीसी टीव्ही कॅमेरे बसवले असून लवकरच स्पीड कॅमेरेही बसवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader