लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : दादर येथील कै. भागोजी बाळूजी कीर हिंदू स्मशानभूमीमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या प्रार्थनागृहांची आणि स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी. तसेच, स्मशानभूमी परिसरामध्ये हिरवळीसह उत्तम नागरी सेवा – सुविधा पुरवाव्यात, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

गगराणी यांनी दादर येथील कै. भागोजी बाळूजी कीर हिंदू स्मशानभूमीला बुधवारी भेट देऊन नागरी सेवा-सुविधांची पाहणी केली. यावेळी परिमंडळ दोनचे उपायुक्त प्रशांत सपकाळे, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

स्मशानभूमीत असलेली दफनभूमी, दहनवाहिनी, केश कर्तनालय, प्रार्थनागृह तसेच येथील विविध इमारतींची गगराणी यांनी भेटीदरम्यान पाहणी केली. तसेच, स्मशानभूमीची कार्यप्रणाली, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांबाबत नागरिकांच्या काही सूचना किंवा तक्रारी आहेत का ? याबाबत आयुक्तांनी अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

पाहणीनंतर गगराणी यांनी, स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी उपस्थित राहण्याकरिता येणाऱ्या नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेणे प्रशासनाची जबाबदारी आहे. तथापि, उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा अधिक चांगल्या प्रकारे देता येतील का, याबाबतही विचार करून कार्यवाही करावी. अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेता सध्या येथे उपलब्ध असलेल्या प्रार्थनागृहांच्या संख्येत वाढ करावी. ही प्रार्थनागृहे नाविन्यपूर्ण आणि कल्पकतेने बांधवीत. सध्या स्मशानभूमीमध्ये पारंपरिक पद्धतीने तसेच विद्युत दहनवाहिनीद्वारे अंत्यसंस्कार केले जातात. पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कारासाठी लाकूड इंधन म्हणून वापरण्याऐवजी अन्य काही स्रोतांचा वापर करता येईल का, याचाही अभ्यास करण्यात यावा, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान, वायू प्रदूषण कमी करण्यासठी पालिकेने मुंबईतील सर्व स्मशानभूमीमध्ये गॅस किंवा विद्युत दाहिनीची सोय उपलब्ध करून देण्याचा दीर्घकालीन प्रकल्प हाती घेतला आहे. सन २०२५-२६ मध्ये पालिकेतील पाच स्मशानभूमींचे पीएनजी स्मशानभूमीत रुपांतर करण्यात येणार आहे. तर नऊ स्मशानभूमीमध्ये पारंपरिक चितेऐवजी पर्यावरणपूरक शवदाहिनी सुरू करण्यात येणार आहे. वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याकरीता लाकडाऐवजी पीएनजी अथवा शेणाच्या पर्यावरणपूरक शवदाहिनी वापरण्यासाठी नगारिकांना प्रोत्साहित केले जाते.

मुंबईत एकूण २०१ स्मशानभूमी आहेत. त्यापैकी महानगरपालिकेच्या ८८ तर खासगी ११३ स्मशानभूमी आहेत. त्यापैकी महापालिकेच्या ५२ हिंदू, २५ मुस्लिम आणि ११ ख्रिश्चन स्मशानभूमी आहेत. तर, ५२ हिंदू स्मशानभूमीपैकी १० स्मशानभूमी या संयुक्त आहेत. यामध्ये सर्व धर्मीयांसाठी अंत्यविधी करण्याची सोय उपलब्ध आहे. सद्यस्थितीत १० स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनी व १८ स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिनी बसवण्यात आल्या आहेत.

Story img Loader