मुंबई : ‘आपले सरकार’ संकेतस्थळाद्वारे सध्या ५३६ सेवा देण्यात येत असून, त्यांचा राज्यातील नागरिकांना चांगला लाभ होत आहे. त्यामुळे ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिले. फडणवीस यांनी राज्य सेवा आयोगाच्या कामकाजाचा आढावा सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेतला.
हेही वाचा – मुंबई : विनातिकीट प्रवाशांकडून १०४ कोटी रुपयांची दंडवसुली
फडणवीस म्हणाले की, गतिमान व पारदर्शक प्रशासनासाठी नागरिकांना ‘आपले सरकार’ संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. आता अधिक सक्रियतेने आणि सुलभपणे व्यापक स्वरुपात या संकेतस्थळाद्वारे नागरिकांना जास्तीत जास्त ऑनलाईन सेवा उपलब्ध होतील, यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी आयोगाची कार्यपद्धती व भविष्यकालीन योजनांबाबत यावेळी सविस्तर माहिती दिली.