२८ दिवसांत दोन्ही मात्रा पूर्ण होत असल्यामुळे अधिक कल

शैलजा तिवले
मुंबई : रेल्वे प्रवासासह उपाहारगृहे, मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दोन मात्रा घेणे बंधनकारक केल्यामुळे २८ दिवसांत दोन मात्रा पूर्ण होणाऱ्या कोव्हॅक्सिनची मागणी मुंबईत वाढली आहे. मात्र सरकारी केंद्रावर लशींचा साठा उपलब्ध नसल्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये कोव्हॅक्सिनच्या मागणीत अधिक वाढ झाली आहे.

राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून लशीच्या दोन मात्रा पूर्ण केलेल्यांसाठी रेल्वे प्रवासासह मॉलमध्ये प्रवेशाची मुभा दिली. तसेच खासगी आस्थापना १०० टक्के खुली करण्याची आणि उपाहारगृहे, मॉलही खुले करण्यास परवानगी दिली. परंतु मॉल आणि उपाहारगृहांतील कर्मचाऱ्यांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेण्याची अट घातली. बहुतांश खासगी आस्थापनांनीही लशींच्या दोन्ही मात्रा पूर्ण करण्याचा तगादा कर्मचाऱ्यांच्या मागे लावला आहे. कोव्हिशिल्डच्या दोन मात्रांमध्ये ८४ दिवसांचे तर कोव्हॅक्सिनच्या दोन मात्रांमध्ये २८ दिवसांचे अंतर आहे. लवकरात लवकर दोन मात्रा पूर्ण करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून कोव्हॅक्सिन घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे.

जुलैमध्ये मोठय़ा प्रमाणात साठा आला होता त्यावेळी ८० टक्के नागरिकांना कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावेळी एप्रिलनंतर प्रथमच कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा उपलब्ध करून देण्यात आली. परंतु आता १५ ऑगस्टपासून कोव्हॅक्सिनच्या पहिल्या मात्रेची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. यात प्रामुख्याने उपाहारगम्ृहे, खासगी कंपन्या आणि मॉलमधील कर्मचाऱ्यांचा अधिक समावेश आहे. परंतु त्यानंतर कोव्हॅक्सिनचा साठा कमी येत असल्यामुळे पहिली मात्रा मागणीच्या तुलनेत देणे शक्यच होत नाही. आता तर कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत असल्यामुळे पहिली मात्रा न देण्याच्या सूचना आलेल्या आहेत, असे बीकेसी करोना रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी सांगितले.

उपाहारगृहे खुली करत असल्याने स्थलांतरित कामगार परत येत आहेत. याच्या दोन्ही मात्रा लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक असल्याने बहुतांश जण कोव्हॅक्सिनच घेत आहेत. परंतु सरकारी केंद्रावर फारसे उपलब्ध नसल्यामुळे मग खासगी केंद्रांमध्ये घ्यावे लागत आहे, असे आहार संघटनेचे शिवानंद शेट्टी यांनी सांगितले. दोन्ही मात्रा २८ दिवसांत पूर्ण होत असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नक्कीच कोव्हॅक्सिनची मागणी वाढली आहे. आधीच्या तुलनेत कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसून येते. दोन्ही लशींची परिणामकता सारखीच आहे, असे मत बॉम्बे रुग्णालयाचे फिजिशियन डॉ. गौतम भन्साली यांनी व्यक्त केले.

नागरिकांच्या खिशाला भुर्दंड

सरकारी केंद्रावर कोव्हॅक्सिन फारसे उपलब्ध नसल्यामुळे पहिली मात्रा फार कमी केंद्रांवर दिली जाते. त्यामुळे नाईलाजाने नागरिकांना दोन मात्रांसाठी २७०० रुपये मोजत खासगी रुग्णालयाकडे जावे लागत आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरात खासगी रुग्णालयातील कोव्हॅक्सिनचे लसीकरण वाढले आहे.

Story img Loader