टॅक्सी भाडय़ापासून बडय़ा हॉटेलच्या बिलापर्यंतच्या अब्जावधी रुपयांच्या व्यवहारात मोबाइल बँकिंगची साथ; पाच वर्षांत ६८ टक्क्यांनी वाढ
अगदी टॅक्सी भाडय़ापासून ते बडय़ा हॉटेल्समध्ये पैसे भरण्याचे काम मोबाइलमधून होत असेल तर कशाला हवी आहे पाकिटाची गरज. पैसे खर्च करण्याच्या या नव्या सवयीमुळेच मोबाइल वॉलेट्सच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांची उलाढाल २०१५-२०१६ या आर्थिक वर्षांत तब्बल पाच वर्षांच्या तुलनेत ६८ टक्क्यांनी वाढून १.१५ अब्ज अमेरिकन डॉलपर्यंत नोंदविली गेली आहे.
देशात जशा सुविधा उपलब्ध होत आहे त्या प्रमाणात लोकांच्या सर्व सवयी बदलू लागल्या आहेत. स्मार्टफोनने तर आपले आयुष्य अगदी जलद केले असून ते सोपेही केले आहे. क्रेडिट कार्ड घेण्यासाठी घाबरणारा ग्राहक आज मोबाइल वॉलेट्समधून बिनधास्त व्यवहार करू लागला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बसल्या जागी मिळणारी सुविधा आणि त्याचबरोबर मिळणाऱ्या विविध ऑफर्स हे आहे. आज आपल्या देशात दूरसंचार कंपन्यांनी विकसित केलेले, स्वतंत्रपणे कंपनी स्थापून विकसित केलेले आणि बँकांनी पुरस्कृत केलेले सुमारे २५ मोबाइल वॉलेट्स उपलब्ध आहेत. २०११ मध्ये या माध्यमातून ८६ लाख अमेरिकन डॉलरची उलाढाल झाल्याची नोंद आहे. सुरुवातीला असलेल्या मर्यादित सुविधा, अज्ञान आणि विश्वासार्हता यामुळे फारसे लोक या सुविधांचा वापर करत नव्हते. मात्र कंपन्यांनी ग्राहकाला सुरक्षित व्यवहाराची हमी दिली आणि सुविधांमध्येही वाढ केली. म्हणूनच या वॉलेट्सच्या माध्यमातून आज अगदी टॅक्सीचालकाला पैसे देण्यापासून ते पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी करता येणे शक्य झाल्या आहेत. यामुळे गेल्या पाच वर्षांचा कालावधीत याचा वापर वाढला आणि पर्यायाने उलाढालही वाढू लागली.
मोबाइल रिचार्जपासून डीटीएचच्या रिचार्जपर्यंतची सुविधा पुरविणाऱ्या फ्रीचार्ज या अॅपच्या माध्यमातून दिवसाला दहा लाख व्यवहारांची नोंद होत असल्याची माहिती कंपनीचे सीओओ गोविंद राजन यांनी सांगितले. प्रत्येक व्यवहारात किमान १५० रुपयांचे रिचार्ज होत असल्यामुळे या अॅपच्या माध्यमातून दिवसाला सुमारे १५ कोटींचे व्यवहार होत असतील. याचबरोबर विविध प्रकारचे बिल्स भरण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या पेटीएम या अॅपच्या माध्यमातून दरमाह सात कोटी ५० लाख व्यवहारांची नोंद होत असल्याचे कंपनीने सांगितले. याचबरोबर दरमाह बिल भरणाऱ्या व्यवहारांमध्ये २०० टक्के वाढ होत असून येत्या काळात दोन अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या व्यवहारांचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. याचबरोबर मोबाइल वॉलेटच्या माध्यमातून होणारा पेमेंट उद्योग आता फायद्यात येऊ लागल्याची नोंदही कंपनीने केली आहे. पेटीएमसारखेच काम करणाऱ्या ऑक्सिजन वॉलेटच्या माध्यमातून दरवर्षांला ६० कोटी व्यवहारांची नोंद होत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
असा होतो व्यवहार
या कंपन्यांची नोंदणी होऊन त्यांना विविध मान्यता मिळाल्यानंतर हे व्यवहार सुरू करतात. यासाठी ते बडय़ा कंपन्यांपासून ते अगदी छोटय़ा दुकानदारांपर्यंत पोहोचून त्यांच्यातील आणि ग्राहकांतील दुवा बनतात. ग्राहक या माध्यमातून ज्या कंपनीशी व्यवहार करतो त्या कंपनीकडून अॅप कंपनीला व्यवहारामागे मोबदला मिळतो. यातून कंपन्यांचे मुख्य उत्पन्न होते. याचबरोबर जाहिराती आणि प्रमोशन्सच्या माध्यमातूनही कंपन्यांना उत्पन्न होते. या उत्पन्नातून कंपन्या ग्राहकांना कॅशबॅक किंवा कूपन्ससारख्या सुविधा देतात.
मोबाइल वॉलेट म्हणजे काय
मोबाइल बँकिंग हे ऑनलाइन बँकिंगच्या पुढचे पाऊल मानले जाते. यात काही बँकांनी त्यांचे पेमेंट अॅप्स बाजारात आणले आहेत तर काही दूरसंचार कंपन्यांनीही असे अॅप्स आणले आहेत. याचबरोबर काही त्रयस्थ कंपन्यांनी बहुसंख्य कंपन्यांच्या सहकार्याने अॅप्स बाजारात आणून मोबाइलच्या माध्यमातून बिल भरण्याची सुविधा ग्राहकांना दिली आहे. ही वॉलेट ग्राहक व विक्रेत्यांमधील दुवा आहेत.
फ्रीचार्जसारख्या अॅपद्वारे अवघ्या दहा सेकंदांमध्ये एखादा आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकतो. यामुळे बहुतांश ग्राहक अशा सुविधांचा वापर करतात. या अॅप्सच्या माध्यमातून मिळणारी सुविधा ग्राहकांना आकर्षित करते. मात्र या ऑफर्सना आकर्षित होणाऱ्या ग्राहकांची संख्या तुलनेत कमी आहे. देशात उपलब्ध झालेले स्वस्तातील स्मार्टफोन आणि ते वापरणाऱ्यांची वाढती संख्या या उद्योगाला भविष्यात आणखी बळकटी देईल.
– गोविंद राजन, सीओओ फ्रीचार्ज