शैलजा तिवले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाबाधितांमध्ये ३० ते ४० वयोगटातील तरुणांमधील संसर्गाचे प्रमाण वाढत असून अचानकपणे संसर्गाची तीव्रता वाढल्याने मृत्यू होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हे प्रमाण तुलनेने कमी असले तरी लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तींनीही प्रकृतीकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्ग झपाट्याने पसरत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. संसर्गाच्या बदलत्या स्वरुपानुसार लक्षणांसह वयोगटानुसारही काही बदल झाल्याचे दिसून येत आहे. पहिल्या लाटेमध्ये ३० ते ४० वयोगटातील रुग्णांची संख्या तुलनेने कमी होती. संसर्ग झालेल्यांपैकी काहींना सौम्य लक्षणे असली तरी हे रुग्ण गृह किंवा संस्थात्मक विलगीकरणात काहीच दिवसात बरे होत होते. परंतु दुसऱ्या लाटेमध्ये तरूणांचाही मृत्यू झाल्याचे आढळले आहे.

पहिल्या लाटेमध्ये रुग्णालय रुग्णांनी भरले तरी बहुतेक रुग्ण हे चाळीशीच्या वरील होते. परंतु आता चाळीशीच्या आतील रुग्णही रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे.  काही रुग्णांना फुप्फुसच नव्हे तर हृदयाशी निगडित तीव्र आजार झाल्याचे दिसून आले आहे, असे वोक्हार्ट रुग्णालयाचे अतिदक्षता विभागाचे प्रमुख आणि करोना कृती दलाचे सदस्य डॉ. केदार तोरस्कर यांनी सांगितले. आरटीपीसीआर चाचणीमध्ये बाधित नसल्याचे दाखविले असले तरी सिटी स्कॅन किंवा क्षकिरण चाचणीत मात्र फुप्फुसांवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निदानामध्येही संभ्रम निर्माण होत असल्याने उपचार वेळेत सुरू केले जात नाहीत. परिणामी रुग्णाची प्रकृती खालावते असे निरीक्षणही पालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी नोंदविले.

मृतांमध्ये दहा टक्के तरुण

‘दहा मृतांपैकी एका रुग्णाचा मृत्यू अचानकपणे संसर्गाची तीव्रता वाढल्याने होत असल्याचे दिसून आले आहे. यात ३० ते ४० वयोगटातील रुग्णांचा समावेश असून यांमध्ये अनेकजणांना कोणतीही लक्षणे नव्हती. काहींना सौम्य लक्षणे असले तरी त्यांची प्रकृती स्थिर होती. परंतु आठ दिवसांनतर अचानकपणे रुग्णांची प्रकृती गंभीर होते आणि ते दगवतात असे आढळले आहे. अचानकपणे छातीचे ठोके वाढणे किंवा  रुग्ण सायटोकाईन स्ट्रॉर्ममध्ये जाणे यामुळे या रुग्णांचा मृत्यू होत आहे. तसेच काही रुग्णांना न्युमोनिया झाल्याचेही आढळले आहे. अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की एकतर हे रुग्ण उशीरा रुग्णालयात येतात. काहीच औषधे घेतलेली नसतात. कदाचित या संसर्गाचे हे बदलते स्वरुप असू शकते. त्यामुळे रुग्णांमध्ये संसर्गाची तीव्रता आठ दिवसानंतर अचानकपणे वाढल्याचे आढळून येते’,  असे मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

गृहविलगीकरणातही  लक्ष आवश्यक

लक्षणे नाहीत किंवा असली तरी सौम्य लक्षणे आहेत म्हणून  तरूण रुग्णांनी आजाराकडे दुर्लक्ष करू  नये. आजाराची तीव्रता अचानकपणे वाढण्याचा धोका असल्याने गृहविलगीकरणात असले तरी डॉक्टरांशी कायम संपर्कात राहून आवश्यक औषधोपचार घेणे गरजेचे आहे. तसेच सौम्य लक्षणे असली तरी चाचणी करून निदान करणेही आवश्यक आहे. जेणेकरून पुढील संभाव्य धोके टाळता येतील, असे डॉ. सुपे यांनी अधोरेखित केले.