मुंबई : वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर असलेले आबा आज आंधळे झाले आहेत. अनेक वर्षांचा मधुमेह असल्यामुळे डायबेटीक रेटिनोपॅथीचा त्यांना त्रास होता. मात्र गावाकडे याबाबत फारशी माहिती नसल्यामुळे उपचारांकडे दुर्लक्ष झाले व आबांना अंधत्व आले. भारतातील गावखेड्यांमध्ये मधुमेहाच्या व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वेगाने वाढत आहे. त्या तुलनेत डायबेटीक रेटिनोपॅथीच्या आजाराची माहिती लोकांना नाही तसेच तपासणीची यंत्रणा नसल्याने हजारो मधुमेहग्रस्त हजारो लोकांची रेटिनोपॅथीच्या आजाराने अंधत्वाकडे वाटचाल सुरु असल्याचे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मोतीबिंदूमुक्त भारत या केंद्र शासनाच्या उपक्रमाप्रमाणेच मधुमेह असलेल्या रुग्णांच्या डोळ्यांची (रेटिना) व्यापक तपासणी मोहीम घेऊन जागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रेटिनाशी संबंधित डोळ्यांचे आजार झपाट्याने वाढत असून लाखो भारतीयांच्या दृष्टीस धोका निर्माण झाला आहे. हे आजार पूर्वी केवळ वृद्ध व्यक्ती वा मधुमेही रुग्णांमध्ये दिसत होते. परंतु आता तरुणांमध्येही या आजारांचे निदान होऊ लागले आहे. २०२४ मध्ये एम्स व आरोग्य मंत्रालयाने केलेल्या अभ्यासानुसार, सध्या भारतात सुमारे ९८ लाख लोक रेटिनाच्या कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहेत. २०३० पर्यंत हे प्रमाण सव्वा कोटीपर्यंत पोहोचेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. अर्थात वेगवेगळ्या संस्थांची आकडेवारी काही प्रमाणात वेगळी आहे. दुसऱ्या एका अभ्यासानुसार आजघडीला सव्वा कोटीहून अधिक लोकांना रेटिनाचा आजार आहे.

रेटिना म्हणजे आपल्या डोळ्याच्या मागील भागातील एक नाजूक पटल असते, जे प्रकाश पकडून मेंदूपर्यंत दृश्यमान संदेश पोहोचवण्याचे काम करते. या भागाला झालेल्या आजारांना रेटिनाचे आजार असे म्हणतात. या रचनेत कोणताही बिघाड झाला तर ती अंशतः किंवा पूर्णपणे अंधत्व येऊ शकते. डोळ्याच्या मागील बाजूस असलेल्या प्रकाश-संवेदनशील ऊतींच्या रक्तवाहिन्यांना झालेल्या नुकसानीमुळे (रेटिना) हा आजार होतो. भारतात मुख्यत्वे डायबेटिक रेटिनोपथी, एज-रिलेटेड मॅक्युलर डीजेनेरेशन (एएमडी), रेटिनल डिटॅचमेंट आणि रेटिनायटिस पिगमेंटोसा (पीआर) हे आजार आढळतात. त्यापैकी डायबेटिक रेटिनोपथी हा मधुमेहामुळे होणारा प्रमुख आजार असून याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

भारत मधुमेहीची जागतिक राजधानी बनण्याच्या मार्गावर असून आजघडीला दहा कोटीहून अधिक लोकांना मधुमेह आहे तर प्री-डायबेटिक लोकांचा विचार केल्यास ही संख्या १३ कोटीच्या घरात असल्याचे आयसीएमआरचा २०२३ अहवाल सांगतो. रक्तातील साखरेच्या वाढीचा शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम होत असतो. यात डोळ्यांवर होणारा परिणाम गंभीर असून ४० वर्षांवरील प्रत्येक पाचपैकी एक मधुमेही रुग्ण रेटिनाच्या समस्यांनी ग्रस्त असतो. दुर्देवाने अनेक लोकांना याची कल्पनाही नसते. विख्यात नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले की, आमच्याकडे येतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांमधील ६०–७० ते दृष्टी आधीच कमी झालेली असते. याला मधुमेहाप्रमाणेच अन्य कारणेही आहेत. बहुतेक प्रकरणात रेटिनाची नियमित तपासणी केली जात नाही. चाळीशीवरील मधुमेहाच्या प्रत्येक रुग्णाने नियमितपणे रेटिनाची तपासणी करणे आवश्यक आहे.

ग्रामीण भागात एकीकडे मधुमेहाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे रेटिनाच्या तपासणीसाठी पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे मोतिबिंदू मुक्त भारत संकल्पनेप्रमाणे केंद्र शासन व राज्य शासनाने रेटिनाच्या तपासणीसाठी व्यापक मोहीम राबविणे गरजेचे असल्याचे डॉ. लहाने म्हणाले. आता फंडस कॅमेरे आले आहेत तसेच टेलिमेडिसीनच्या मदतीने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रेटिना तपासणीची मोहीम आरोग्य विभाग राबवू शकतो. यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण डॉक्टरांना तसेच तंत्रज्ञांना दिल्यास मोठ्या प्रमाणात तपासणी करता येईल असे डॉ. लहाने यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शहरांमध्ये झपाट्याने बदलणारी जीवनशैली, आहारातील बिघाड आणि सतत डिजिटल स्क्रीनसमोर राहणं यामुळे तरुणांमध्येही रेटिनाचे आजार दिसू लागले आहेत. एम्सच्या एका अभ्यासानुसार आठ तासांहून अधिक स्क्रीनटाइम असलेल्या व्यक्तींमध्ये लवकरच रेटिनावर ताण दिसतो. विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या २५ ते ३५ वयोगटातील व्यावसायिकांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. यामुळे हे आजार आता वयस्क लोकांपुरते मर्यादित न राहता तरुणांमध्येही दिसू लागल्याचे डॉ. लहाने म्हणाले. एका अभ्यासानुसार १६.९ टक्के लोकांना डायबेटिक रेटिनोपथीचा त्रास आहे.

शहरी भागात निदान आणि उपचाराची सुविधा जरी असली, तरी ग्रामीण भागात परिस्थिती अत्यंत बिकट आहे. भारतातील ७५ टक्के नेत्रतज्ज्ञ शहरी भागातच कार्यरत असले तरी शहरी तसेच ग्रामीण भागातही रेटिनाच्या आजाराविषयी पुरेशी जागरुकता नसल्याचे पुण्यातील ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. राजेश पवार यांनी सांगितले. भारतात आजघडीला रेटिना तज्ञांची संख्याही कमी असून सुमारे १८ हजार रेटिनातज्ज्ञ भारतात आहेत. यातील बहुतेक नेत्रतज्ज्ञ हे शहरी भागातील रेटिना केंद्रांमध्ये तसेच मोठ्या रुग्णालयात कार्यरत आहेत. अशावेळी ग्रामीण भागातील मधुमेही रेटिना रुग्णांची नियमित तपासणी हे एक आव्हान आहे. वेळेत हा प्रश्न लक्षात आल्यास उपचार शक्य आहेत. लेझर तसेच इंजेक्शनच्या माध्यमातून रेटिनावर उपचार केले जातात. बहुतेक प्रकरणात लेझर उपचार तसेच तीन ते पाच इंजेक्शनचा कोर्स पुरसा असतो. मात्र दोन टक्के प्रकरणात बराच काळ इंजेक्शन घेत राहावी लागतात, असेही डॉ. पवार म्हणाले. शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून डायबेटीक रेटिनोपथीविषयी व्यापक जागृती होण्याची गरज असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आता रेटिनाच्या तपासण्यांचा समावेश करण्यात आला आहे. २०२३–२४ साठी या कार्यक्रमासाठी २६० कोटींची तरतूद झाली आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून गुजरात, तमिळनाडू, आणि केरळ राज्यांमध्ये मधुमेहींसाठी दरवर्षी डोळ्यांची तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, देशभर याची अंमलबजावणी अजूनही मर्यादित आहे. उपचाराची किंमत ही एक मोठी समस्या आहे. ओसीटी स्कॅन, लेसर थेरपी किंवा इंजेक्शनसाठी येणारा खर्च मोठा असतो. ग्रामीण किंवा गरीब रुग्णाना हे उपचार करणे आर्थिक कारणासाठी अशक्य होते.

मधुमेही आणि वृद्ध नागरिकांसाठी दरवर्षी रेटिनाची तपासणी अनिवार्य करावी असे विख्यात नेत्रतज्ञ डॉ. रागिनी पारेख यांनी सांगितले. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात नेत्रचिकित्सा विभागाच्या प्रमुख असताना त्यांनी मधुमेही रुग्णाच्या रेटिना तपासणीसाठी प्रचंड आग्रही होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार मधुमेहाचा रुग्ण हा सर्वप्रथम डायबिटॉलॉजिस्टकडे जात असतो. या डॉक्टरांनी मधुमेही रुग्णांना नियमितपणे रेटिनाची तपासणी करण्याचा सल्ला दिला पाहिजे. डायबेटिक रेटिनोपथीबद्दल आजही अनेक मधुमेही रुग्ण अनभिज्ञ आहेत. रेटिनाचे बहुतांश आजार वेळेवर ओळखल्यास टाळता येतात किंवा उपचार करता येतात. एकदा गेलेली दृष्टी परत मिळवणं अत्यंत कठीण आहे. त्यामुळे आता प्रतिबंधात्मक पावलं उचलणं हाच एकमेव पर्याय असल्याचे डॉ. रागिनी पारेख यांनी सांगितले. सरकारने व्यापक जनजागृती करून लोकांमध्ये रेटिनाच्या आजारांबाबत माहिती दिली पाहिजे. डोळ्यांची नियमित तपासणी ही अत्यंत गरजेची आहे, विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी वेळोवेळी नेत्रतपासणी करून रेटिनावर नियंत्रण ठेवता येऊ शकते असेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील मधुहेमी रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने रेटिनाच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबविली पाहिजे, असेही डॉ. पारेख यांनी सांगितले.