गाडीची ‘फटफट’ वाढवण्यासाठी दोन ते चार हजारांत बदल
मुंबईतील वाहनांची प्रचंड संख्या, त्यांच्या हॉर्नचा आवाज यामुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होत असतानाच यात आता ‘सायलेन्सर’मधून येणाऱ्या आवाजाची भर पडली आहे. वाहनांच्या इंजिनाचा आवाज कमी करण्यासाठी बसवण्यात येणाऱ्या ‘सायलेन्सर’मध्ये नियमबाहय़ बदल करून हा आवाज वाढवण्याकडे वाहनचालकांचा विशेषत: तरुणवर्गाचा कल वाढला आहे. या यंत्रणेत अवघ्या दोन ते चार हजारांत नियमबाहय़ बदल करून देण्याचा धंदा सध्या मुंबईत राजरोसपणे सुरू आहे.
शहरात कायद्याचे सर्रास उल्लंघन करत तीन हजारांपासून ते वीस हजार रुपयांच्या मोबदल्यात आवाजाची पातळी वाढवणारे ‘सायलेन्सर’ बसवून मिळत आहेत. अशा सायलेन्सरच्या आवाजाने आपल्या गाडीकडे इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा आणि त्यातून स्वत:ची प्रतिष्ठा मिरवण्याचा शौक तरुणवर्गात रुजत चालला आहे. मात्र, अशा सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषण २०० ते २३० डेसिबलवर पोहोचत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या अडीच वर्षांत या प्रकरणी अवघ्या १५१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अशा प्रकारचे सायलेन्सर वापरणाऱ्यांच्या तुलनेत कारवाईचे प्रमाण नगण्य आहे.
वांद्रे, कुर्ला आणि भायखळा परिसरांत अशा प्रकारचे आवाजी सायलेन्सर बसवून देण्याचा जोरदार धंदा सुरू आहे. दुचाकीची सीसी जेवढी जास्त तेवढा जास्त आवाज उत्पन्न करून देण्याची हमी गॅरेजवाले देत आहेत. याशिवाय सायलेन्सरमधून कोणता भाग काढल्यास जास्त आवाज निर्माण होईल. तसेच इंजिन बंद करून सुरू केल्यानंतर किती वेगवेगळ्या आवाज निर्माण केला जाऊ शकेल याच्या क्लृप्त्या दिल्या जात आहेत.
अडीच वर्षांत केवळ १५१ जणांवरच कारवाई!
गेल्या अडीच वर्षांत ‘आवाजी’ सायलेन्सर बसवणाऱ्या १५१ जणांवरच कारवाई करण्यात आली आहे. यात त्यांच्याकडून ५२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. २०१४ साली ७७, २०१५ साली ५६, तर २०१६ साली (मे महिन्यापर्यंत) १८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.