मुंबई : कायम वर्दळ असलेल्या बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेरील पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. महानगरपालिका प्रशासन अधूनमधून संबंधित फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारत आहे. मात्र, पदपथांवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायमस्वरुपी हटविण्यात पालिका पूर्ण अपयशी ठरली आहे. रस्त्यांवर पसरलेल्या पथाऱ्यांमुळे पादचारी, प्रवाशांना अडथळा ठरत आहेत.
बोरिवली पोलीस ठाण्याच्या आसपासच्या परिसरातही फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. तसेच, सातत्याने फेरीवाल्यांची संख्या वाढत असून ही समस्या सोडविण्यात यंत्रणा उदासीन असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
हेही वाचा…भारतीय पारपत्रावर ११ वर्षे परदेशात वास्तव्य, विमानतळावर बांगलादेशी नागरिकाला अटक
एस. व्ही. मार्ग, जांभळी गल्ली आणि आसपासच्या परिसरात फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवाशांना फेरीवाल्यांचे अडथळे पार करून स्थानक गाठावे लागत आहे. गरोदर स्त्रिया, वृद्ध, अपंग तसेच शालेय विद्यार्थ्यांना या समस्येमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. फेरीवाल्यांच्या समस्येमुळे प्रवाशांना रस्त्यावरून चालताना अडथळा निर्माण होत आहे. तसेच, यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
संबंधित ठिकाणच्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक दाखल होताच काही वेळ रस्ते मोकळे होतात. मात्र, पथक निघून गेल्यानंतर काही वेळात फेरीवाले पुन्हा पदपथ आणि रस्त्यांवर अतिक्रमण करतात. अनधिकृत फेरीवाल्यांना आता पालिकेप्रमाणेच पोलिसांचीही भीती राहिलेली नाही. बोरिवली स्थानकाबाहेरील पोलीस ठाण्याला लागूनच अनेक अनधिकृत विक्रेत्यांनी पथाऱ्या पसरले आहेत.
पादचारी आणि फेरीवाल्यांमध्ये अनेक वेळा वाद होतात. फेरीवाले अर्वाच्च भाषेत पादचाऱ्यांना शिवीगाळ करतात. या संदर्भात प्रशासनाकडे तक्रारी करूनही ही समस्या जैसे थे आहे. न्यायालयाने रेल्वे स्थानकांपासून
१५० मीटर अंतरावर व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई केली आहे. मात्र, बोरिवलीसह विलेपार्ले येथील तेजपाल नगर, मोंघीबाई मार्ग, मालाडमधील आनंद मार्ग, अंधेरीतील एम. ए मार्ग, स्टेशन रोड, एस. बी मार्ग आदी भागात फेरीवाल्यांनी पथाऱ्या पसरल्या आहेत. विलेपार्ले स्थानकाबाहेरील रस्त्यांवर थेट अनधिकृत दुकाने थाटण्यात आली आहेत.
दादरमधील सेनापती बापट मार्ग, डिसिल्व्हा मार्ग, रानडे मार्ग, एन. सी केळकर मार्ग, छबिलदास मार्गावरही फेरीवाल्यांनी पथाऱ्या पसरल्या आहेत. वांद्रे येथील हिल रोड आणि आसपासच्या परिसरातही अशीच स्थिती आहे. गोवंडी, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड आदी परिसरातही फेरीवाल्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
‘केवळ विचारमंथन नको’
उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून मुंबई पालिकेला अनेकदा खडसावले आहे. मात्र, मुंबईतील पदपथ अद्यापही फेरीवाल्यांच्या कचाट्यातून मोकळे झालेले नाहीत.काही पदपथ अनधिकृत बांधकामांनी गिळंकृत केलेले आहेत. तर, अनेक ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी पदपथांवर ठाण मांडले आहे. नागरिकांना चालण्यासाठी मोकळी जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकतेच, न्यायालयाने अतिक्रमणाची समस्या सोडवण्याबाबत विचारमंथन करण्यात वेळ खर्ची घालण्याऐवजी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश सोमवारी दिले आहेत.