मागणी वाढल्याने औषधांचा तुटवडा भासण्याची भीती
शैलजा तिवले, लोकसत्ता
मुंबई : करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये साखरेची अनियंत्रित पातळी आणि स्टिरॉईडसह अन्य औषधांमुळे कमी झालेल्या रोगप्रतिकारकशक्तीमुळे म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण दुसऱ्या लाटेत वाढले आहे. या आजारावरील औषधे महागडी असून, मागणी वाढल्याने औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पहिल्या लाटेत करोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना म्युकरमायकोसिसची बाधा झाल्याचे आढळले होते. यात काही रुग्णांना दृष्टीही गमवावी लागली. दुसऱ्या लाटेत या रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. त्यामुळे केवळ सरकारीच नव्हे तर खासगी कान, नाक, घसातज्ज्ञांकडे या रुग्णांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. ‘‘पहिल्या लाटेनंतर दोन महिन्यांतून एखाद्या रुग्णाला याची बाधा झाल्याचे पाहायला मिळत होते; परंतु आता तीन ते चार दिवसांतून एक रुग्ण येत आहे. संपूर्ण राज्यात या आजाराचे प्रमाण वाढले आहे,’’ असे कान- नाक- घसातज्ज्ञ डॉ. सोनाली पंडित यांनी सांगितले. केईएममध्ये याची बाधा झालेल्यांची रुग्णसंख्या गेल्या लाटेच्या तुलनेत दुपटीने वाढल्याचे कान- नाक- घसा विभागाचे प्रमुख डॉ. हेतल मारफतिया यांनी सांगितले. मुंबईत उपनगरीय रुग्णालयांमध्येही हे रुग्ण मोठय़ा प्रमाणात येत असून तेथील अनेक रुग्ण उपचारांसाठी पाठविले जात असल्याचे कूपर रुग्णालयातील कान- नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. शशिकांत म्हशाळ यांनी सांगितले.
स्टिरॉइड्सच्या अतिरेकी वापराचे परिणाम..
‘पहिल्या लाटेच्या वेळी स्टिरॉइडचा वापर उशिरा सुरू झाला. त्यामुळे याचा वापर तुलनेने अधिक काळजीपूर्वक केला गेला; परंतु दुसऱ्या लाटेत करोना रुग्णांच्या उपचारामध्ये स्टिरॉइडचा अतिरेक आणि गैरवापर केल्यामुळे ही रुग्णसंख्या वाढली आहे. तसेच कमी झालेली रोगप्रतिकारकशक्ती ही बुरशीच्या वाढीसाठी पोषक ठरत असल्याने इतर औषधांच्या वापराचा अतिरेकही यास कारणीभूत आहे का याचा अभ्यास करणे गरजेचे आहे,’ असे मत कान-नाक- घसातज्ज्ञ डॉ. अशेष भूमकर यांनी व्यक्त केले.
म्युकरमायकोसिस म्हणजे काय?
‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार आहे. या बुरशीचा हवेतून संसर्ग होते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असलेल्यांना यापासून धोका नाही; परंतु रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेल्या रुग्णांना तीव्र धोका असतो. नाकावाटे ही बुरशी शरीरात प्रवेश करते. तेथून ती सायनसमध्ये वाढते. कर्करोगाच्या पेशींपेक्षाही जलद गतीने वाढणारी ही बुरशी डोळ्यांतील पेशी, मेंदूतही प्रवेशही करते. त्यामुळे इतर बुरशीजन्य आजारांपेक्षाही हा संसर्ग अधिक धोकादायक असून याची बाधा झालेल्यांमध्ये जवळपास ३० टक्के मृत्युदर आहे.
रुग्णाची अवस्था दयनीय
पालिका आणि सरकारी रुग्णालयात आवश्यक औषधांचा साठा कमी आहे. त्यामुळे याला पर्यायी औषधांचा वापर केला जातो. परंतु, या पर्यायी औषधांचे दुष्परिणामही अधिक आहेत. काहीवेळा औषधे नातेवाईकांना आणायला सांगतो, अशी माहिती पालिकेच्या डॉक्टरांनी दिली. पहिल्या पाच ते सात दिवसांसाठीच साठ हजारांहून अधिक खर्च असल्याने आम्ही हा खर्च कसा करायचा असा प्रश्न रुग्णांकडून उपस्थित केला जात आहे.
‘एमआरआय’द्वारे योग्य निदान
ही बुरशी शरीरात नाकातून डोळे, मेंदू अशी पसरली जाते. त्याचे निदान सिटीस्कॅन किंवा इतर चाचणीमध्ये होत नाही. ते एमआरआयमध्येच योग्यरितीने होते. प्रत्येक रुग्णाचे एमआरआय करणे गरजेचे आहे. एमआरआय करण्यासाठी साधारण एक तास लागतो आणि ही चाचणी महागही आहे. सध्या चाचण्या केंद्रांवर सिटीस्कॅनसाठीच एवढी गर्दी असते की एमआरआयसाठी वेळ देण्यास केंद्र तयार होत नाहीत. त्यामुळे पुढील काळात परिस्थिती आणखी आव्हानात्मक असेल, असे मत डॉ. भूमकर यांनी व्यक्त केले.
आजाराची तीव्रता अधिक
म्युकरमायकोसिस आजार कर्करोगापेक्षाही झपाटय़ाने वाढतो. याची लक्षणे सर्वसामान्य असल्याने याचे निदानही लवकर होत नाही. त्यामुळे आमच्याकडे येणारे बहुतांश रुग्ण हे मुंबईबाहेरील असून निदान होऊन रुग्णालयात येईपर्यत यांच्यातील आजाराची तीव्रता खूप वाढलेली असते. गेल्या वर्षी मेंदूपर्यत हा आजार गेल्याचे फारसे आढळत नव्हते. परंतु सध्या आमच्याकडे १० रुग्णांच्या मेंदूपर्यत ही बुरशी पोहोचली आहे. पाच रुग्णांचा डोळा काढावा लागला आहे. त्यामुळे निदान वेळेत करणे आवश्यक आहे, असे डॉ. हेतल यांनी सांगितले. या आजाराच्या उपचारासाठी आता जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक असे अन्य जिल्ह्यातूनही रुग्ण मुंबईत येत आहेत.
प्रतिबंधात्मक उपायांवर भर
करोना झाल्यानंतर स्टिरॉईड खूप प्रमाणात घेतलेले, अतिदक्षता विभागात उपचार घेतलेले, कृत्रिम श्वसनयंत्रणेवर बराच काळ असलेले आणि मधुमेह असलेल्या रुग्णांना या आजाराचा धोका अधिक आहे. आजारातून बरे झाल्यानंतर दर आठवडय़ाला नाकाची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून केल्यास वेळेत निदान होऊ शकेल. तसेच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचीही तपासणी करणे आवश्यक आहे. या आजाराबाबत समाजमाध्यमातून भीती निर्माण करणाऱ्या संदेश पसरविले जात असून घाबरून जाऊ नये, असे डॉ. सोनाली पंडित यांनी सांगितले.
लक्षणे
नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वाहत राहणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, अकारण दात हलणे, दात दुखणे
औषधांचा खर्च सुमारे १५ ते २० लाख
करोनाच्या आधी हा आजार वर्षांतून तीन ते चार रुग्णांमध्ये आढळून येत होता. त्यामुळे औषधांची मागणीही तुलनेने कमी होती; परंतु आता रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याने औषधांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे पुढील काही आठवडय़ांत याचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. मुळातच ही औषधे खूप महाग आहेत. रुग्णाला ही औषधे जवळपास तीन ते सहा आठवडय़ांपर्यंत घ्यावी लागतात. त्यामुळे एका रुग्णाला जवळपास १५ ते २० लाखांपर्यंतच खर्च येतो, अशी माहिती कान-नाक- घसातज्ज्ञ डॉ. अशेष भूमकर यांनी दिली.