मुंबई : अवयवदानाकडे नागरिकांचा कल वाढावा यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मेंदूमृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांकडून अवयवदानास प्रतिसाद मिळू लागला आहे. मात्र नात्यांमधील अवयवदानालाही आता नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. मुंबई शहरामध्ये मागील १० महिन्यांमध्ये नात्यामध्ये ५२ अवयवदान झाले. यामध्ये परदेशातील एका नातेवाईकाने अवयवदान केल्याचे निदर्शनास आले आहे.
राज्यातील अवैध अवयवदानाच्या प्रकारास आळा घालण्यासाठी १९९४ मध्ये कायदा करण्यात आला. या कायद्याची अंमलबजावणी २०१८ पासून सुरू झाली. त्यानुसार अवैध अवयवदानाला आळा घालण्यासाठी शासन स्तरावर समिती स्थापन करण्यात आली. या समितीअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विभागीय अवयव प्रत्यारोपण प्राधिकरण समितीअंतर्गत गेल्या १० महिन्यांमध्ये नात्यांतर्गत ५२ अवयवदान व प्रत्यारोपण करण्यात आले. यामध्ये मूत्रपिंडांचे सर्वाधिक ३० प्रत्यारोपण करण्यात आले आहे. त्याखालोखाल यकृत १८ आणि आतडे एक, तर कुटुंबामध्ये अवयवाची अदलाबदली केल्याच्या तीन प्रकरणांचाही समावेश आहे.
विभागीय अयवय प्रत्यारोपण समितीकडून अवयव दाता आणि प्राप्तकर्त्या व्यक्तीची व त्याच्या कुटुंबीयांची सर्व कागदपत्रे तपासून, त्यांची चौकशी करूनच अवयवदानाच्या शस्त्रक्रियेला परवानगी देण्यात येते. या समितीच्या अध्यक्षस्थानी कामा व आल्बलेस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे असून समिती सदस्यांमध्ये एक सहयोगी प्राध्यापक, एक मायक्रोबायोलॉजी प्राध्यापक, दोन आयएमए सदस्य आणि दोन आरोग्य सेवा सदस्य आणि एक पोलीस सदस्य आहे. परवानगी देण्यात आलेल्या या रुग्णांचे अवयव प्रत्यारोपण ग्लोबल रुग्णालय, सैफी रुग्णालय, सर एच. एन. रिलायन्स रुग्णालय, व्होकार्ट रुग्णालय, बॉम्बे रुग्णालय, जसलोक आणि केईएम रुग्णालयामध्ये करण्यात आले.
आतापर्यंत झालेल्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया ग्लोबल रुग्णालयामध्ये करण्यात आल्या आहेत. ग्लोबल रुग्णालयामध्ये २९ प्रत्यारोपण झाले आहे. त्याखालोखाल एच. एन. रिलायन्स रुग्णालयामध्ये आठ, बॉम्बे आणि सैफी रुग्णालयात प्रत्येकी चार, जसलोकमध्ये तीन आणि केईएम व व्हाेकार्ट रुग्णालयामध्ये प्रत्येकी दोन अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
गेल्या १० महिन्यांत नात्यांमध्ये अवयव दान करण्यासाठी नागरिक पुढे येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेकांना योग्य वेळी अवयव प्राप्त होण्यास मदत होते आणि त्यांना जीवदान मिळते. मात्र ही प्रक्रिया पारदर्शी व्हावी, कोणताही गैरव्यवहार होऊ नये, अवयवांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियांवर नियंत्रण रहावे यासाठी अवयव दाता आणि प्राप्तकर्ता यांची कसून चौकशी करण्यात येते, असे विभागीय अवयव प्रत्यारोपण प्राधिकरण समिती, अध्यक्ष, डॉ. तुषार पालवे म्हणाले.