मुंबई : पूर्व उपनगरातील कांजूरमार्ग येथील पालिकेच्या क्षेपणभूमीतील कचऱ्याची दुर्गंधी दिवसेंदिवस वाढत असून या परिसरातील रहिवाशांना श्वास घेणेही मुश्कील झाले आहे. कंत्राटदार योग्य पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावत नसून त्यामुळे लाखो नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करीत मुलुंडमधील एका सामाजिक कार्यकर्त्याने मुंबई महापालिका प्रशासनाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच राज्य सरकारचा नगर विकास विभाग, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही नोटीस पाठवली आहे.

गेले अनेक महिने कांजूरमार्ग कचराभूमीतून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येत असून त्यामुळे कांजूर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंडमधील लाखो नागरिकांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना स्वच्छ हवेचा, शुद्ध प्राणवायूचा मूलभूत हक्क डावलला जात आहे. पालिकेने या कचराभूमीसाठी नेमलेला कंत्राटदार योग्य पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावत नसल्याचा आरोप करीत प्रयास सेवाभावी संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते ॲड. सागर देवरे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच राज्य सरकारचा नगर विकास विभाग, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही नोटीस पाठवली आहे. पंधरा दिवसात या नोटीसीवर उत्तर न दिल्यास उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही दिला आहे.

या नोटीसमध्ये देवरे यांनी म्हटले आहे की, स्वच्छ हवा हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. मात्र मुलुंड, कांजूरमार्ग, विक्रोळी परिसरातील नागरिकांना स्वच्छ हवा मिळूच शकत नाही. कचराभूमीतील दुर्गंधी या परिसरात पसरत आहे. रात्रीच्या वेळी प्रचंड दुर्गंधी येत असल्यामुळे रहिवाशांना घराची दारे, खिडक्या बंद करूनच राहावे लागते. कांजूरमार्ग कचराभूमीच्या ३ किमी त्रिज्येच्या परिसरातील लाखो रहिवाशांना या दुर्गंधीचा त्रास सोसावा लागत आहे. या कचराभूमीमुळे या परिसरातील जैव विविधतेला व प्राणी, पक्षी यांच्याही आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

कांजूरमार्ग कचराभूमीवर सगळ्या मुंबईचा कचरा खुल्या पद्धतीने टाकला जातो. या कचराभूमीवर नेमलेले कंत्राटदार या कचऱ्याची घनकचरा व्यवस्थापन उपविधी २०१६ नुसार विल्हेवाट लावत नाहीत, असा आरोप देवरे यांनी केला आहे. या कचऱ्यावर कोणतेही दुर्गंधीनाशक द्रव्य फवारले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कोणतीही शास्त्रशुद्ध पद्धत वापरली जात नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

या प्रकल्पामध्ये नवीन कचरा टाकला जाऊ नये, असलेल्या कचऱ्यावर योग्य पद्धतीने प्रकिया करावी. या प्रकल्पाची आयआयटी किंवा नीरी सारख्या संस्थामार्फत चौकशी करून योग्य ती कारवाई करावी आणि दोषींविरोधात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी देवरे यांनी केली आहे. दरम्यान, कांजूर येथे दररोज स्वीकारल्या जाणाऱ्या सुमारे ४८०० मेट्रीक टन कचर्यावर शास्त्रोक्त पद्धतीने बायोरिएक्टर तंत्रज्ञानाद्वारे व १००० मेट्रीक टन कचर्यावर खत निर्मिती तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया केली जाते. तसेच दुर्गंधी येऊ नये म्हणून कचऱ्यावर एंझाईमचा समावेश असलेल्या द्रव्याचा फवारा दिवस-रात्र केला जातो, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. तसेच कचरा स्वीकारण्यात येणाऱ्या ठिकाणाच्या आजूबाजूला सुगंधित द्रव्याची फवारणी करण्याकरीता मिस्टींग यंत्राची व्यवस्था केली आहे. दुर्गंधी पसरू नये म्हणून कचऱ्यावर मातीचे आवरण टाकण्यात येते, असेही पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

कांजूरमार्गमध्ये सगळ्या मुंबईचा कचरा …

मुंबईत दरदिवशी सुमारे सहा हजार मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. पालिकेच्या चार कचराभूमींपैकी बोरिवलीतील गोराई कचराभूमी बंद करण्यात आली आहे. तर मुलुंड कचराभूमी बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे तिथे कचरा स्वीकारला जात नाही. त्यामुळे हा कचरा पूर्व उपनगरातील देवनार आणि कांजूरमार्ग येथील कचराभूमीत टाकला जातो. एकूण कचऱ्यापैकी तब्बल ९० टक्के कचरा हा कांजूरमार्ग कचराभूमी येथे टाकला जातो. तर केवळ ५०० ते ६०० मेट्रीक टन कचरा देवनार क्षेपणभूमीवर नेला जातो. त्यामुळे कांजूरमार्ग कचराभूमीवर सगळ्या मुंबईचा कचरा नेऊन टाकला जातो. ११८ हेक्टर जागेवरील या कचराभूमीची क्षमताही संपत चालली आहे.