विविध ६० प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनसंरचनेत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने सुमारे ११ हजार शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे. याबरोबरच कारागृह हवालदार, अग्निशामक दलातील विमोचक, पोलीस नाईक आदी जोखमीची कामे करणाऱ्यांना विशेष वेतन मंजूर करण्यात आले आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जानेवारी २००६ पासून सुधारित वेतनसंरचना मंजूर करण्यात आली होती. मात्र ही सुधारणा करताना काही त्रुटी राहून गेल्या होत्या. त्रुटींचे निवारण करण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आला. या निर्णयामुळे ६० विविध सवंर्गातील वेतनसंरचेनत सुधारणा होणार आहे. जोखीम पत्करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर विशेष वेतनश्रेणी द्यावी ही मागणी करण्यात येत होती. त्यानुसार पोलीस नाईक, कारागृह हवलदार, अग्निशमन दलात प्रत्यक्ष मोहिमेत भाग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

Story img Loader