लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अपक्ष उमेदवारांनीही कंबर कसली असून घरोघरी जाऊन ते प्रचार करीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या, मुंबईतील झोपडपट्टी, जुन्या चाळी व इमारतींचा पुनर्विकास, बेरोजगारी, महागाई, आरोग्य, शिक्षण आदी विविध मुद्दे केंद्रस्थानी ठेऊन अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
राजकीय पक्षांमधील फूट, दिग्गज नेत्यांचे बंड, सत्तेसाठी जुळलेली अनपेक्षित समीकरणे, पक्षांतर आणि अभूतपूर्व सत्तांतरामुळे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारण विस्कटले आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मुख्य राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडे वेळ उरलेला नाही, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे नेतृत्व हे सर्वसामान्य नागरिकांनीच करावे, असा सूर मुंबईतील अपक्ष उमेदवारांमध्ये आहे. अनेक अपक्ष उमेदवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
आणखी वाचा-अखेर ना. म. जोशी मार्ग बीडीडीतील ३०५ रहिवाशांना मिळाली घराची हमी
अनेक उमेदवार स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी व कोणाला तरी धडा शिकवण्याच्या उद्देशाने निवडणूक लढवत असून विकासाच्या मुद्द्यांशी त्यांचा काहीही संबंध नाही. सर्वसामान्य नागरिक पुढे जाऊ शकतात, लोकशाहीमुळे ते शक्य आहे, हेच जाणून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रशांत घाडगे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. तर गरिबांचा कोणी नेता उरलेला नाही. विविध कामांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे स्वत: मैदानात उतरून दक्षिण मुंबईतून निवडणूक लढविण्याचा निर्णय मनीषा गोहिल यांनी घेतला. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात धारावीचा पुनर्विकास हा महत्वाचा मुद्दा असून याच मुद्याला धरून दक्षिण मध्य मुंबईतील अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ‘अबकी बार घर का अधिकार’ हा नारा देत दक्षिण मध्य मुंबईतून अॅड. संतोष सांजकर निवडणूक लढवत आहेत. विकासाच्या नावाखाली मुंबईकर बाहेर फेकला जाऊ नये, अशी भावना सांजकर यांची आहे. तर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी आकाश खरटमल यांनी दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
आणखी वाचा-‘उत्तम आरोग्यासाठी दुधाचा चहा टाळा’
बेरोजगारी व महागाई हे सर्वसामान्यांचे महत्वाचे प्रश्न सोडवायचे असतील तर सर्वसामान्यांनी मैदानात उतरले पाहिजे, या भावनेने उत्तर मध्य मुंबईतून राजेश लोखंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विविध विकासकामे अद्यापही प्रलंबित आहेत. वाहतूक कोंडी, शिक्षण, आरोग्य आदी महत्वाच्या मुद्द्यांवर ठोस निर्णय होत नाहीत, त्यामुळे हे मुद्दे संसदेत मांडण्यासाठी डॉ. गफ्फार सय्यद उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवत आहेत. तसेच सर्वसामान्य नागरिक व विशेषत: महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अॅड. लता शिंदे निवडणूक लढवत आहेत. मला माझ्या विभागात विकास हवा आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी व्हावे यादृष्टीने संकल्प सोडत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून गृहिणी हृदा शिंदे निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. नागरिकांची कामे नागरिकांमध्ये राहून करणारा लोकप्रतिनिधी असावा आणि भ्रष्टाचार कमी होण्यासाठी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लक्ष्मण कुराडे निवडणूक लढवत आहेत. तर शैक्षणिक वस्तूंवरील कर कमी करणे, झोपडपट्टींचा पुनर्विकास आदी विविध मुद्दे केंद्रस्थानी ठेऊन दीप्ती वालावलकर या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तसेच सर्वसामान्य नागरिकांना सरकारी योजनांचा योग्य लाभ मिळावा, सरकारी कागदपत्रे तात्काळ मिळावीत, दैनंदिन समस्या सुटाव्यात म्हणून ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शहाजी थोरात निवडणूक लढवत आहेत. तसेच सर्वसामान्य नागरिकांना वैद्याकीय सुविधा वेळेत मिळाव्यात आणि जनतेच्या मताचा दुरुपयोग होऊ नये, त्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकारण व्हावे यासाठी डॉ. सुषमा मौर्य निवडणुकीला सामोरे गेल्या आहेत.
आणखी वाचा-मुंबई : वडाळा दुर्घटनेच्या चौकशीचा निर्णय
पैशांच्या उधळपट्टी रोखण्याचे धोरण
मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघातील मतदानाला अवघे काही दिवस उरले असून प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारफेरी, सभा, बैठका, मिरवणुका आणि नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर दिला आहे. परंतु मोठ्या स्तरावर प्रचार करण्यासाठी आवश्यक ते आर्थिक पाठबळ नसल्यामुळे मुंबईतील अपक्ष उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. लोकसभा निवडणूक लढविण्यामागची उद्दिष्ट्ये आणि निवडून आल्यास कोणकोणती विकासकामे करणार, याबाबत मतदारांना समजावून सांगत पत्रक वाटप करीत आहेत. काही अपक्ष उमेदवारांकडे जवळपास ४० ते ५० कार्यकर्त्यांची पथके असून दहा – दहा जणांचे चार ते पाच गट घरोघरी जाऊन अपक्ष उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. तर पैशांची उधळपट्टी न करणे आणि प्रचार करताना जनतेला त्रास होऊ नये, यासाठी केवळ घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा निर्णय काही उमेदवारांनी घेतला आहे.
निवडणूक चिन्ह सामांन्यांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान
राज्यात महायुती व महाविकास आघाडी अशी थेट लढत होत असून कमळ, धनुष्यबाण, घड्याळ, मशाल, हाताचा पंजा, तुतारी वाजविणारा माणूस ही चिन्हे सर्वांच्या परिचयाची झाली आहेत. परंतु निवडणुकीच्या रणधुमाळीत अपक्षांना देण्यात आलेली चिन्हेही लक्षवेधी ठरतात. मुंबईतील काही अपक्ष उमेदवारांची निवडणूक चिन्हे ही त्यांच्या कार्यक्षेत्राशी निगडित आहेत. तर काहींची चिन्हे दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या वस्तू आहेत. वातानुकूलित यंत्र, शिट्टी, खाट, टाईपरायटर, टॉर्च, काडेपेटी, ऊस शेतकरी, पेनाची निब सात किरणांसह, स्टेथॉस्कोप आदी विविध चिन्हांवर मुंबईतील अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत असून हे निवडणूक चिन्ह सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.