बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी घटनांचे गुन्हे नोंदविण्यासाठी प्रत्येक राज्यात एक स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन करण्याच्या ‘एनआयए’ (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) या केंद्रीय यंत्रणेच्या प्रस्तावास राज्य सरकारने मान्यता दिली असून, मुंबईत लवकरच ‘एनआयए’चे पोलीस ठाणे सुरू होईल.
दहशतवादी गुन्ह्य़ांची नोंद व तपास कोणी करावा, यावरून केंद्रीय यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांमध्ये वाद होतात. काही वेळा पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करतात. यातूनच ‘एनआयए’ने स्वत:चे पोलीस ठाणे असावे, असा प्रस्ताव सादर केला होता. संपूर्ण महाराष्ट्रासाठी मुंबईत स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन करण्यास ‘एनआयए’ला राज्याच्या गृह विभागाने मान्यता दिल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. राज्यात एखादी दहशतवादी घटना घडल्यास स्थानिक पोलीस ठाण्याबरोबरच ‘एनआयए’च्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ शकेल. एकाच घटनेचे दोन गुन्हे दाखल झाले तरीही तपास ‘एनआयए’च्या पोलीस ठाण्याच्या माध्यमातून केला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले. यामुळे स्थानिक पोलीस व ‘एनआयए’मध्ये काही वाद होण्याची शक्यता नाही, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
मुलुंड येथे अनधिकृत झोपडय़ा उभारणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे टाळून त्या पाडण्यास भाग पाडणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. मुलुंड पोलिसांच्या या कृतीची सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सदानंद दाते यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे.
पोलिसांनी काही चुकीची कृती केली असल्यास मुलुंडमधील नवघर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांच्या विरोधात कारवाई करण्याचे संकेतही पाटील यांनी दिले. पोलिसांना दोष दिला जात असला तरी मुंबई महानगरपालिकेच्या दिमतीला दिलेल्या पोलिसांचा महापालिकेने वापर का केला नाही, असा सवालही पाटील यांनी केला.

Story img Loader