मुंबई : यंदा मोसमी पाऊस दमदार पडेल, अशी आनंदवार्ता भारतीय हवामान विभागाने दिली आहे. जून ते सप्टेंबर या चारही महिन्यांत मोसमी पावसासाठी प्रादेशिक आणि जागतिक हवामानविषयक स्थिती अनुकूल राहील. देशात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे, १०५ टक्के पाऊस पडेल असा दीर्घकालीन अंदाज वर्तविण्यात आला.
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी र्नैऋत्य मोसमी पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. प्रशांत महासागरात ‘ला निना’ स्थिती संपून तटस्थ स्थिती निर्माण झाली आहे. एल निनो स्थिती सप्टेंबरपर्यंत म्हणजे पावसाळा संपेपर्यंत निर्माण होण्याची स्थिती नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात तटस्थ स्थिती राहून भारत आणि भारतीय उपखंडातील मोसमी पावसासाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यासाठी दिलासा
लडाख, ईशान्य भारत आणि तमिळनाडूवगळता देशाच्या अन्य भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्याचा विचार करता, दक्षिण कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. गतवर्षी १०६ टक्के अंदाज जाहीर केला होता, प्रत्यक्षात १०८ टक्के पाऊस झाला.
डिसेंबर-मार्च या काळात युरोशिया आणि हिमालयात बर्फाच्छादित भाग सरासरीपेक्षा कमी राहिला आहे. बर्फवृष्टी जास्त झाल्यास कमी पाऊस पडतो. कमी बर्फवृष्टीमुळे यंदा सरासरीपेक्षा जास्त १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
प्रमुख तीन अनुकूल घटक
●प्रशांत महासागरातील निष्क्रिय स्थिती
●हिंदी महासागर द्विध्रुवितेची निष्क्रिय स्थिती
●आशिया आणि युरोपात सरासरीपेक्षा कमी बर्फवृष्टी