इंडिया आघाडीची बैठक उद्या (३१ ऑगस्ट) मुंबई होऊ घातली आहे. देशभरातील अनेक राजकीय नेते उद्या बैठकीसाठी मुंबईत येणार आहेत. मुंबईच्या ग्रॅण्ड हयात या हॉटेलमध्ये ही बैठक होणार असून ही बैठक यशस्वी होण्याकरता राज्यातील महाविकास आघाडीने जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, या बैठकीआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. उद्याच्या बैठकीबाबत त्यांनी या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितला आहे.
हेही वाचा >> “मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठीच महाविकास आघाडी सरकार…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर गंभीर आरोप
विविध विचारधारा असलेले देशभरातील पक्ष इंडिया आघाडीअंतर्गत एकत्र आले आहेत. एनडीए आणि पर्यायाने भाजपाला टफ फाईट देण्याकरता इंडिया आघाडी लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार आहे. मात्र, या निवडणुकीत सर्वात मोठी अडचण ठरणार आहे ती जागा वाटपाची. जवळपास सर्वच पक्ष एकत्र आल्याने जागा वाटपाचा तिढा निर्माण होऊ शकतो. या जागावाटपाबाबत उद्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. तसंच, चार राज्यांच्या निवडणुकांसह लोकसभेच्याही निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागा वाटप करण्यासाठी केंद्र नेमण्यात आले आहेत का असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.
हेही वाचा >> “…तर मोदी सरकार मोफत गॅस सिलिंडर देईल”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत
शरद पवार म्हणाले की, “आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू केलेली नाही. पहिल्या दोन बैठका झाल्या त्या महत्त्वाच्या होत्या. उद्याच्या बैठकीत इथून पुढे सामूहिक कार्यक्रम काय असावा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्या शक्यतेवेळी असा निर्णय झाला तर काही लोकांवर ही जबाबदारी द्यावी लागेल. अन्य राजकीय घटक पक्षांशी संवाद साधून यातून आपण एकत्र जाऊ शकतो का यासंदर्भातील अभ्यास करण्याबाबत काही लोकांवर जबाबदारी सोपवावी लागेल.”
याच पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टोलेबाजी केली आहे. ‘इंडिया’च्या तिसऱ्या बैठकीपूर्वीच केंद्र सरकारने २०० रुपयांनी गॅस सिलिंडरचा दर कमी केला. ‘इंडिया’ जसं जसं पुढे जाईल, तसं एक दिवस असा येईल, की केंद्र सरकार मोफत गॅस सिलिंडर देईल, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.