मुंबई : भारत कृषी रसायनांचा जगातील सर्वात निर्यातदार ठरला आहे. गत आर्थिक वर्षांत ४५ हजार कोटी रुपयांच्या रसायनांची निर्यात झाली आहे. अमेरिका, जपान, चीननंतर जगातील चौथ्या क्रमांकाचा उत्पादक आहे. तर जगभरात तणनाशकांचा वापर वेगाने वाढत असून, जमिनीच्या आरोग्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिका, जपान, चीननंतर भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा  कीडनाशके, बुरशीनाशके, पीक संरक्षके आणि तणनाशकांचा म्हणजे कृषी रसायनांचा उत्पादक देश झाला आहे. भारतातील कृषी रसायनांची बाजारपेठ आठ अब्ज डॉलरवर पोहचली आहे. त्यात ६१ टक्के वाटा निर्यातीचा तर ३९ टक्के वाटा देशांतर्गत वापराचा आहे. गत दहा वर्षांत भारत कृषी रसायनांचा जगातील एक प्रमुख निर्यातदार देश म्हणून समोर आला आहे. आर्थिक वर्ष २०२३ – २४ मध्ये देशातून सुमारे ४५ हजार कोटी रुपये किंमतीच्या कृषी रसायनांची निर्यात झाली आहे. आर्थिक वर्ष २०२१ – २२ मध्ये कृषी रसायनांची निर्यात ३६,५२१ कोटी रुपयांवर होती.

देशातील कृषी रसायन उद्योगांची एकूण उलाढाल ७५ हजार कोटींवर गेली आहे, त्यात देशांतर्गत वापराच्या कृषी रसायनांची बाजारपेठ ३० हजार कोटींवर आहे. अमेरिका सर्वात मोठा आयातदार असून, त्या खालोखाल ब्राझील आणि जपानचा नंबर लागतो. दर्जेदार आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेल्या कृषी रसायनांची जगातील १४० देशांना निर्यात केली जाते. कृषी रसायने तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाची तसेच रासायनिक मिश्रणाची आयात १४,३१५ कोटींवर गेली असून, देशातील कृषी रसायन उद्योगाची वार्षिक १० ते १२ टक्क्यांनी वाढ होत आहे. जागतिक कीडनाशकांची बाजारपेठ ७५.५ अब्ज डॉलरवर पोहचली आहे. त्यात पेटेंट असलेल्या जेनरिक रसायनांचा वाटा ७० अब्ज डॉलर आहे. २०३१ पर्यंत कृषी रसायनांची जागतिक बाजारपेठ १०६.७ अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज,  पेस्टिसाईड मॅन्युफॅक्चर्स अॅण्ड फॉम्युलेटर्स असोशिएसन ऑफ इंडियाने (पीएमएफएआय) व्यक्त केला आहे.

तणनाशकांचा वाढता वापर धोक्याचा

तणनाशकाचा जागतिक बाजारपेठेत दबदबा आहे. रसायनाच्या बाजारपेठेत तणनाशकांचा वाटा ४७ टक्क्यांवर गेला आहे. त्या खालोखाल कीडनाशके आणि बुरशीनाशकांचा वाटा २५ टक्के आहे. भारताचा विचार करता कृषी रसायनांच्या एकूण बाजारात कीटकनाशकांचा वाटा ५३ टक्के, बुरशीनाशकाचा २४ टक्के, तणनाशकांचा १९ टक्के आहे. भारत जगाला कीडनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशके पुरविणारा आघाडीचा देश झाला आहे. देशात अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. बुरशीनाशके आणि तणनाशकांची निर्यात गत चार वर्षांत ४० टक्क्यांनी वाढली आहे. अमेरिका, जर्मनी, युरोप आणि अन्य आशियाई देशांना निर्यात होते. भारतातील कंपन्या अन्य जागतिक कंपन्यांच्या तुलनेत कमी किंमतीत कृषी रसायनांचा पुरवठा करतात.

सरकारने प्रोत्साहन देण्याची गरज कीडनाशक आणि पीक संरक्षक कृषी रसायनांच्या जागतिक बाजारपेठेत चीन हा भारताचा मुख्य स्पर्धक आहे. रसायनांच्या किंमतीतही चीन भारताचा स्पर्धक आहे. चीन सरकार निर्यातीसाठी प्रोत्साहनपर अनुदान देते. शिवाय उद्योगाना कमी किंमतीत वीज, अन्य सुविधांसह निर्यातीला अनुदान देते. भारत सरकारकडून असे कोणतीही प्रोत्साहानपर अनुदान मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कृषी रसायन उद्योगाला प्रोत्साहनपर निर्णय घेण्याची गरज आहे, असे मत पेस्टिसाईड मॅन्युफॅक्चर्स अॅण्ड फॉम्युलेटर्स असोशिएसन ऑफ इंडियाचे (पीएमएफएआय) अध्यक्ष प्रदीप दवे यांनी व्यक्त केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India become world s largest exporter of agrochemicals mumbai print news zws