मुंबई : ज्येष्ठ संघ प्रांत प्रचारक लक्ष्मणराव इनामदार यांचे जीवन तपस्वी, अलौकिक होते, डॉ. हेडगेवारांचा परीसस्पर्श झाल्याने ते परीसच बनले. आपले कर्तृत्व, वकिलीचे शिक्षण, गुणसंपदा व आध्यात्मिक तेज हे त्यांनी संघ कार्यात ओतले. आपली जबाबदारी पार पाडत असताना ही साधना किंवा तपश्चर्या केल्याशिवाय भारत विश्वगुरू होऊ शकत नाही. त्याशिवाय आपला समाजही शांतीपूर्ण, वैभवसंपन्न आणि नीतीसंपन्न होणे, स्वत:चे जीवन निरामय होणे आणि आपल्या मित्राचाही लाभ होणे शक्य नसल्याचे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
देशाचे जीवन जगाला मार्गदर्शक ठरायचे असेल, तर हाच एकमेव मार्ग असल्याचे भागवत यांनी स्पष्ट केले. संघाची दृष्टी किंवा विचार ज्यांना स्पष्टपणे समजला, त्यांची दिशा किंवा निर्णय संघाच्या तत्त्वाशी फटकून असणारच नाही. आणीबाणीच्या काळात त्याचे प्रत्यंतर आले. संघ कधीही हिंसेचे समर्थन करीत नाही, असे मत डायनामाईट प्रकरण चालू असताना एका संघाच्या बैठकीत लक्ष्मणरावांनी मांडले होते. जुलमी राजवटीने राज्यघटना बाजूला ठेवली असली, तरीही हे ब्रिटिश सरकार नाही, राज्यघटनेनुसार सत्तेवर आलेले आहे, असे मत त्यांनी मांडले होते. हिंदूची संघटना म्हणजे मुस्लीम किंवा ख्रिश्चनांचा विरोध नसून प्रतिक्रिया आहे. हे मतही त्यांनी परखडपणे मांडले होते, असे भागवत यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व राजाभाऊ नेने लिखित लक्ष्मणराव इनामदार यांच्या जीवनावरील ‘सेतुबंध’ या गुजराती ग्रंथाच्या मराठी अनुवादाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्षीय भाषण करताना भागवत यांनी लक्ष्मणरावांच्या जीवनकार्याविषयी विस्तृत विवेचन केले. यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या कार्यक्रमास उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक आणि बिमल केडिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.