मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील नऊ वर्षांच्या कालावधीत देशात शिस्तबद्ध विकास साधला आहे. त्यामुळे भारताला जागतिक अर्थव्यवस्थेच्या नकाशात चमकता तारा म्हणून लौकिक मिळत आहे. अवघे जग भारताचा आदर करते, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी केले. याचबरोबर रब्बी हंगामाचा सुमारे तीन लाख टन कांदा शासन खरेदी करणार असून तशा सूचना ‘नाफेड’ या सरकारी संस्थेला देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
‘जी-२०’च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप पार पडला. यानिमित्त गोयल उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना गोयल म्हणाले, ‘‘मागील नऊ वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पद्धतशीर विकास साधला असल्याचे उदाहरणादाखल सांगितले. त्यामुळे जागतिक पातळीवर भारताचे नाव उंचावले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत हा जागितक महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. म्हणून भारत हा विकसित अर्थव्यवस्था असलेले देश आणि विकसनशील अर्थव्यवस्था असलेले देश यांना जोडणारा आर्थिक सेतू म्हणूून पुढे येत आहे.’’
आंतरराष्ट्रीय व्यापार मंदावला असताना, जागतिक पातळीवर महागाईचा दर वाढलेला असताना, अनेक देशांच्या अर्थव्यवस्था आक्रसल्या आहेत. अनेक देशांचा व्यापार घटलेला असताना तसेच जागतिक शेअर बाजार ढासळले असताना भारतीय अर्थव्यवस्थेने देदीप्यमान कामगिरी केली. त्यामुळे अनेक देशांना भारत हा आशेचा किरण वाटत आहे, असेही गोयल यांनी सांगितले.
विदेशी व्यापार धोरणाची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. शिवाय काही देशांबरोबर मुक्त व्यापारी करार करण्यासंदर्भात बोलणी सुरू आहेत. इग्लंड, कॅनडा, युरोपीयन महासंघ या देशांशी मुक्त व्यापारी करार संदर्भात बोलणी सुरू आहेत. काही देशांबरोबरील बोलणी पुढे गेली आहेत. लवकरच या संदर्भात घोषणा करू, असेही गोयल यांनी सांगितले.
नाफेड रब्बी हंगामाचा कांदा खरेदी करणार
राज्यात कांद्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. कांद्याला दर मिळाला पाहिजे यासाठी सरकारने रब्बी हंगामाचा तीन लाख टन कांदा खरेदी करण्याच्या सूचना ‘नाफेड’ या सरकारी संस्थेला देण्यात आल्या आहेत. त्याचा पाठपुरावा सूरूच आहे, असेही गोयल यांनी यावेळी सांगितले.