हिंदूस्थान हे हिंदूंचे राष्ट्र आहे. हिंदूत्व हीच आपली राष्ट्राची ओळख असून, हिंदू धर्मामध्ये इतर धर्मांना सामावून घेण्याची ताकद असल्याचे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता विरोधकांकडून टीका केली जाऊ लागली आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले.
देशातील सर्व हिंदूंमध्ये समानता आणण्याचे काम आपल्याला पुढील पाच वर्षांमध्ये करायचे आहे. सर्व हिंदूंनी एकाच ठिकाणी पाणी प्यायले पाहिजे, एकाच ठिकाणी प्रार्थना केली पाहिजे, असेही भागवत म्हणाले.
काही दिवसांपूर्वी कटकमध्ये बोलतानाही भागवत यांनी सर्व भारतीयांची सांस्कृतिक ओळख हिंदूत्वच असल्याचे म्हटले होते. इंग्लंडमध्ये राहणारे इंग्रज, जर्मनीमधील जर्मन्स, यूएसएमध्ये राहणारे अमेरिकी तर हिंदूस्थानात राहणारे हिंदू का नाही, असाही प्रश्न त्यांनी त्यावेळी उपस्थित केला होता.