मुंबई : इंडिया या विरोधी आघाडीच्या दोन दिवसांच्या बैठकीला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी इंडियाच्या मानचिन्हाचे (लोगो) अनावरण करण्यात येणार असून, यजमान उद्धव ठाकरे यांनी उपस्थित नेत्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे.
इंडिया आघाडीची बैठक विमानतळाजवळील ‘ग्रॅण्ड हयात’ या पंचतारांकित हॉटेलात होणार आहे. पहिल्या दिवशी सायंकाळी इंडियाच्या मानचिन्हाचे अनावरण केले जाईल. त्यानंतर उपस्थित नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा होईल. रात्री बैठकीचे यजमान उद्धव ठाकरे यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात पुरणपोळी, अळुवडय़ांसह विविध मराठी पदार्थाचा समावेश असेल.
हेही वाचा >>> आमची लढाई हुकूमशाहीविरोधात! शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांचा सूर
शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून औपचारिक बैठकीला प्रारंभ होईल. दुपारी ३ पर्यंत ही बैठक चालणार आहे. यात आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि ११ सदस्यीय समन्वय समितीतील नेतेमंडळींची नावे निश्चित केली जातील. सायंकाळी पत्रकार परिषदेत रणनीती विशद केली जाईल. दोन दिवसांच्या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, दिल्लीचे अरिवद केजरीवाल, तमिळनाडूचे एम. स्टॅलिन, झारखंडचे हेमंत सोरेन हे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सीताराम येचूरी, अखिलेश यादव, मेहबूबा मुफ्ती, डी. राजा आदी २८ पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा >>> केजरीवाल, अखिलेश आणि आता उद्धव ठाकरे, I.N.D.I.A च्या तिसऱ्या बैठकीच्या आधीच पंतप्रधान पदाचे तीन दावेदार
नेतेमंडळी दाखल
ममता बॅनर्जी, लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव, डॉ. फारुक अब्दुल्ला आदी नेते मुंबईत दाखल झाले आहेत. सोनिया गांधी व राहुल गांधी उद्या दुपारी तर केजरीवाल सायंकाळी मुंबईत दाखल होतील. नेतेमंडळींच्या स्वागतासाठी शिवसेना, काँगेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.