मुंबई : इंडियाच्या मानचिन्हाचे (लोगो) अनावरण बैठकीच्या पहिल्या दिवशी करण्याचा नियोजित कार्यक्रम होता. पण नाहक वाद टाळण्यासाठी सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊनच अनावरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी अनावरण केले जाईल, असे सांगण्यात आले.
इंडिया बैठकीच्या पहिल्या दिवशी सायंकाळी मानचिन्हाचे अनावरण, अनौपचारिक चर्चा आणि स्नेहभोजन, असा कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला होता. पण मानचिन्हाचे अनावरण टाळण्यात आले. मानचिन्ह तयार करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. आम आदमी पक्ष व अन्य काही पक्षांनी मानचिन्हावर सहमती घडवून आणावी, अशी भूमिका मांडली.
हेही वाचा >>> इंडियाचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? ओमर अब्दुल्ला यांनी मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले…
मुंबईत दाखल झालेल्या सर्व नेत्यांचे मत विचारात घेऊनच मानचिन्ह अंतिम करावे, असा निर्णय घेण्यात आला. मानचिन्हात भारताचे प्रतिबिंब उमटावे, अशी सूचना करण्यात आली होती. यानुसार तीन ते चार मानचिन्हे तयार करण्यात आली आहेत. यापैकी एकाची निवड केली जाईल. कृषी, शहरी भाग, सर्व समाज घटकांचे प्रतिबिंब उमटेल अशा पद्धतीने मानचिन्ह अंतिम केले जाईल.
निवडणूक चिन्ह नाही मानचिन्ह तयार केले तरी राजकीय पक्ष आपापल्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवतील, असे सांगण्यात आले. मानचिन्ह केवळ इंडिया आघाडीची ओळख ठेवण्यापुरतेच मर्यादित असेल. मानचिन्ह असावे का, असाही एक प्रश्न उपस्थित करण्यात आला.