मुंबई ते नवी मुंबई अंतर केवळ २० ते २२ मिनिटांत पार करता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हाती घेण्यात आलेल्या मुंबई पारबंदर प्रकल्पाचे (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) काम पुर्णत्वास आले आहे. तर आता लवकरच प्रवाशांना या सागरी सेतूवरुन प्रवास करता येणार आहे. कारण १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सागरी सेतूचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा >>> मुंबई : मेट्रोच्या संचलन आणि देखभालीसाठी आता १५५ कोटींचा निधी; आर्थिक अडचणी होणार दूर
एमएमआरडीएकडून २१.८० किमी लांबीच्या शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचे काम २०१८ मध्ये हाती घेण्यात आले. देशातील सर्वात लांब सागरी सेतू अशी ओळख निर्माण करु पाहणार्या या प्रकल्पाच्या पुर्णत्वास काही विलंब झाला आहे. पण आता मात्र एमएमआरडीएने हा प्रकल्प पुर्णत्वास नेला आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून आता केवळ फिनिशिंगचे काम सुरु आहे. दरम्यान या प्रकल्पाचे लोकार्पण २५ डिसेंबरला करण्याचा मानस राज्य सरकारचा होता. मात्र प्रकल्पाचे काम यादरम्यान पूर्ण होऊ शकत नसल्याने हा मुहुर्त साधता आला नाही. पण आता मात्र राज्य सरकारने १२ जानेवारीचा मुहुर्त साधत सागरी सेतुचे लोकार्पण करण्याचे प्रयत्न सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी पंतप्रधानांची वेळ घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकार्यांकडून मात्र याबाबत कोणतीही माहिती दिली जात नसली तरी सुत्रांनी मात्र १२ जानेवारीला लोकार्पण केले जाण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे. सुमारे १८ हजार कोटी रुपये खर्च करत बांधण्यात आलेल्या या सागरी सेतूच्या लोकार्पणानंतर मुंबई ते नवी मुंबई प्रवास २० ते २२ मिनिटांत पार करता येणार आहे. मात्र या अतिवेगवान प्रवासासाठी वाहनचालक-प्रवाशांना पथकर मोजावा लागणार आहे. हा पथकर नेमका किती असेल हे अद्याप जाहिर करण्यात आलेले नाही. मात्र २५० ते ३५० च्या दरम्यान पथकर असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्य सरकारने पथकराची रक्कम निश्चित करण्यासाठी एक समिती नेमली आहे. तेव्हा लोकार्पणाच्या अनुषंगाने आता लवकरच पथकराची निश्चित रक्कमही जाहिर होण्याची शक्यता आहे.