तळपत्या सूर्याकडे नजर लावणेही अवघड असते. पण या सूर्याचा वेध घेण्याचा माणसाचा अट्टहास आहे. यामुळेच चांद्रयान, मंगळयान आणि आता अॅस्ट्रोसॅटच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारतीय अंतराळ संस्थेची (इस्रो) पुढची झेप सूर्याच्या दिशेने असणार आहे. ‘अॅस्ट्रोसॅट’ ही या प्रकल्पाची पहिली पायरी म्हणता येऊ शकेल.
चांद्रयान १च्या यशापूर्वीच भारताने सूर्याकडे झेपावण्याची कास धरली होती. २२ ऑक्टोबर २००८ रोजी भारताची पहिली चांद्रभरारी यशस्वी झाली होती. याआधी जानेवारी २००८ मध्ये सूर्याकडे झेपावण्याच्या दृष्टीने भारतीय वैज्ञानिकांनी हालचाली सुरू केल्या होत्या. याची अधिकृत घोषणा इस्रोचे तत्कालीन संचालक जी. माधवन नायर यांनी नोव्हेंबर २००८ मध्ये केली होती. सूर्य हा पृथ्वीवरून दिसणारा सर्वात प्रज्वलित तारा असून त्याचा अभ्यास झाल्यास ताऱ्यांच्या संदर्भातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळणे सोपे होणार आहे.
यामुळे ‘इस्रो’ने सूर्याकडे झेपावण्यासाठी ‘आदित्य-१’ ही मोहीम आखली. यामध्ये सूर्याच्या शिरोभागाचा अभ्यास करण्यात येणार असून तेथे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचाही अभ्यास या मोहिमेमध्ये करण्याचा विचार आहे. सुरुवातीला ही मोहीम २०१५-१६ मध्ये सुरू करण्याचा विचार होता. मात्र सूर्यकिरणातून उपग्रहाचा बचाव हे या मोहिमेतील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. तसेच एवढय़ा प्रकाशात अपेक्षित छायाचित्र टिपणारी दुर्बीण तयार करण्याचेही आव्हान भारतीय वैज्ञानिकांपुढे होते. यामुळे ही मोहीम २०१७-१८ मध्ये करण्याचे इस्रोने ठरविले. या मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या उपकरणाचे प्रतिरूप तयार झाले असून त्यावर पुढील अभ्यास सुरू आहे. याचे आता काही टप्पेच बाकी असून हे यान नियोजित वेळेत प्रक्षेपित होण्याची शक्यता खगोल वैज्ञानिकांकडून व्यक्त होत आहे.

इस्रोच्या ‘अॅस्ट्रोसॅट’च्या यशाकडे पूर्ण जगाचे लक्ष लागून होते. ही मोहीम यशस्वी झाल्यामुळे त्याचा खरोखरच अभिमान आहे. या मोहिमेचा फायदा भविष्यात खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना होणार आहे. या उपग्रहातून येणाऱ्या छायाचित्रांचा संग्रह काही काळानंतर सर्वासाठी खुला केला जाणार आहे.
– अरविंद परांजपे, संचालक, नेहरू तारांगण.

आपण प्रथमच खगोलशास्त्रीय उपग्रह अवकाशात सोडला आहे. यामुळे हे यश आपल्यादृष्टीने खरोखरच खूप महत्त्वाचे आहे. ही मोहीम भविष्यातील आपल्या ‘आदित्य’ या मोहिमेसाठी एक पाया ठरली आहे. या मोहिमेत ३० वर्षांच्या तरुण वैज्ञानिकापासून ते ७० वर्षांच्या वैज्ञानिकांपर्यंत सर्वाचाच मोलाचा सहभाग होता. यामुळे ही मोहीम म्हणजे या सर्वाच्या मेहनतीला मिळालेले यश असेही आपण म्हणू शकतो.
– अनिकेत सुळे, खगोलशास्त्र अभ्यासक, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र

उपग्रह योग्य प्रकारे काम करीत आहे, या उपग्रहावर अतिशय संवेदनशील यंत्रसामग्री असल्याने संशोधनास योग्य माहिती उपलब्ध करण्याच्या दृष्टीने या उपग्रहाचे महत्त्व आहे. त्याचा कार्यकाल पाच वर्षे आहे. या वेधशाळेची तुलना हबलशी करणे मात्र योग्य नाही.
– प्रकल्प संचालक के. एस. सरमा

असा असेल कार्यरत..
आदित्य-१’ हे ४०० किलो वजनाचे आहे. त्यामध्ये विविध प्रकारच्या दुर्बिणी बसविण्यात येणार आहेत. या उपग्रहाला सूर्याच्या उष्णतेपासून वाचविण्यासाठी तो पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असणाऱ्या ‘एल-१’ या बिंदूवर ठेवला जाणार आहे. या बिंदूवर पृथ्वी आणि सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती त्या उपग्रहाला रोखून ठेवण्यात यशस्वी होणार आहे. प्रक्षेपित झालेला उपग्रह या बिंदूवर स्थिरावल्यास तो पृथ्वीसोबत भ्रमंती करीत राहील असेही वैज्ञानिकांनी स्पष्ट केले.