मुंबई : कझाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये (आयबीओ) भारतीय विद्यार्थ्यांच्या संघाने दमदार कामगिरी करीत चार पदकांवर नाव कोरले. भारतीय संघातील मुंबईच्या वेदांत साक्रे याने सुवर्णपदक पटकावले. तर रत्नागिरीतील ईशान पेडणेकर, चैन्नईतील श्रीजीथ शिवकुमार आणि बरेलीतील यशश्वी कुमार यांनी रौप्य पदकांची कमाई केली.
हेही वाचा >>> मुंबईतील पावसाची माहिती ॲपवर; आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांची निर्मिती
यंदा ७ ते १३ जुलै दरम्यान आयोजित ३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये विविध ८० देशांतून तब्बल ३०५ विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत एकूण २९ सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. दीड तासांच्या चार प्रात्यक्षिक परीक्षा आणि ३ तास २५ मिनिटांच्या दोन लेखी परीक्षांचा या स्पर्धेत समावेश होता. प्राणी शरीरशास्त्र आणि शरीरविज्ञानशास्त्र, रेणविय जीवशास्त्र, जैवरसायनशास्त्र आणि जैव सूचना विज्ञान आदी विविध विषयांचा प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये समावेश होता. तर लेखी परीक्षेत वनस्पती जीवशास्त्र यासारख्या क्षेत्रात अत्याधुनिक संशोधन, पेशी जीवशास्त्र , इथोलॉजी आणि बायोसिस्टमॅटिक्स यावर आधारित प्रश्न विचारले गेले.
हेही वाचा >>> मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १५ जुलैपर्यंत ३५ टक्के साठा, गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक पाणीसाठा
आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या संघाचे नेतृत्व मुंबईतील उपचारात्मक औषध निरीक्षण (टीडीएम) प्रयोगशाळेतील प्रा. शशिकुमार मेनन आणि होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र व टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील डॉ. मयुरी रेगे यांनी केले. आयआयटी मुंबईतील डॉ. राजेश पाटकर आणि बडोद्यातील एम. एस. विद्यापीठातील डॉ. देवेश सुथर यांनी वैज्ञानिक निरीक्षक म्हणून कामगिरी बजाविली. या स्पर्धेसाठी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या जीवशास्त्र ऑलिम्पियाड विभागातर्फे विशेष मार्गदर्शन करण्यासह कार्यशाळांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले होते.