अलिबागमधील मुरूड येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिला पायलटचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पेन्नी चौधरी असे या महिला पायलटचे नाव असून त्यांच्यावर १७ दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते.
भारतीय तटरक्षक दलाचे सी.जी ८९३ हे चेतक हेलिकॉप्टर १० मार्च रोजी मुरुडजवळील नांदगाव कोळीवाडा येथे कोसळले होते. तटरक्षक दलाचे हे हेलिकॉप्टर मुंबईहून मुरुडच्या दिशेने निघाले होते. काशिदजवळ आले असतानाच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे काशिदच्या किनाऱ्यावर हेलिकॉप्टर उतरवण्याचा विचार महिला पायलट चौधरी यांच्या मनात आला होता. मात्र, किनाऱ्यावरील पर्यटकांची संख्या जास्त असल्याने हेलिकॉप्टर नांदगावच्या दिशेने नेण्यात आले. शेवटी हेलकावे खाणारे हे हेलिकॉप्टर नांदगाव येथील खडकावर कोसळले.
दुर्घटनेत महिला पायलट पेन्नी चौधरी या गंभीर जखमी झाल्या होत्या. तर अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले होते. चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्या व्हेंटिलेटरवर होत्या. अखेर मंगळवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.