मुंबई : भारतीय संघाच्या विजयी मिरवणुकीत सुमारे सात ते आठ लाख क्रिकेटप्रेमी सहभागी झाल्यामुळे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांची प्रचंड दमछाक झाली. मोठ्या क्रिकेटप्रेमी रेल्वेने सीएसएमटी आणि चर्चगेट, मरिन लाईन्स रेल्वे स्थानकांवर दाखल झाल्याने रेल्वे पोलिसांची तारांबळ उडाली होती. दक्षिण मुंबईत वाढलेल्या गर्दीचा लोंढा आवरण्यासाठी आणि गर्दी पांगविण्यासाठी रेल्वे पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा मागवावा लागला. विजयी मिरवणुकीसाठी आलेल्या एका तरूण क्रिकेटप्रेमीने धावत्या लोकलमधून हात बाहेर काढल्याने त्याला इजा झाली. तर, एक तरूणी रेल्वे स्थानकातील पायऱ्यावरून घसरून पडल्याने जखमी झाली. या दोन दुर्घटना वगळता रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे रेल्वे मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमदरम्यानच्या रस्त्यावर क्रिकेटप्रेमी दिसत होते. मरिन ड्राईव्ह परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. सुमारे ७ ते ८ लाख क्रिकेटप्रेमी या मिरवणुकीत सहभागी झाले होते, असा अंदाज रेल्वे पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यापैकी ५० टक्क्यांहून अधिक क्रिकेटप्रेमी रेल्वेमार्गाने आले होते. मात्र अनपेक्षितपणे गर्दी वाढल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र रेल्वे पोलीस व इतर सुरक्षा यंत्रणांनी योग्यरित्या गर्दीचे व्यवस्थापन केल्याने कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही. मात्र, धक्काबुक्की, किरकोळ दुखापत, काहीशी चेंगराचेंगरीला क्रिकेटप्रेमींना सामोरे जावे लागले.
हेही वाचा…वायू प्रदूषण निवारणासाठी तरुणांचा पुढाकार, वातावरण फाउंडेशनच्या अहवालातून उघड
दररोज लोकल प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्यास रेल्वे पोलिसांचा हातखंडा आहे. त्याच्यासोबतीला गृहरक्षक, महाराष्ट्र सुरक्षा दल, रेल्वे सुरक्षा बल यांची मदत असते. यासह गणेशोत्सव, महापरिनिर्वाण दिनी गर्दीचे योग्यरित्या व्यवस्थापन केले जाते. रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी २००७ साली टी-२० विश्वचषकाच्या विजयी मिरवणुकीचा अभ्यास केला. यावेळी अधिक गर्दी होण्याची शक्यता होती. त्यानुसार नियोजन करून १०० ते १५० सुरक्षा रक्षक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.
हेही वाचा…मंत्रालयातील नोकरी घोटाळा : आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन
मात्र, गुरुवारी दुपारी ३.३० वाजेनंतर क्रिकेटप्रेमींची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली. नियोजित केलेल्या अंदाजापेक्षा तिप्पट गर्दी वाढल्याने, राज्य राखीव पोलीस दल, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पोलीस यांना पाचारण करण्यात आले. यासह मुंबई सेंट्रल, वांद्रे, अंधेरी, कुर्ला, वडाळा, सीएसएमटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रत्येकी एक उपनिरीक्षक आणि प्रत्येकी १० पोलीस कर्मचारी रेल्वे स्थानक परिसरात दाखल झाले. १०० गृहरक्षक, ५० रेल्वे पोलीस अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा बलाचे १०० अधिकारी, कर्मचारी तैनात केले होते. तसेच चर्चगेटमधील चिंचोळे प्रवेशद्वार बंद करून, फक्त मर्यादीत प्रवेशद्वार खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, अशी माहिती रेल्वे पोलिसाचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.