‘भारतीय दंत परिषदे’ची नवी योजना, अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यास दंतोपचारासोबत अ‍ॅलोपथी करता येणार

दंतवैद्यक अभ्यासक्रमाची पदवी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘बीडीएस’चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ‘एमबीबीएस’चा तीन वर्षांसाठीचा अभ्यासक्रम करण्याची महत्त्वाकांक्षी योजना ‘भारतीय दंत परिषदे’ने (डीसीआय) हाती घेतली आहे. याबाबत दिल्लीत झालेल्या डीसीआयच्या बैठकीत या नव्या अभ्यासक्रमाची रुपरेषा, परीक्षेच्या तयारीपासून अभ्यासक्रमाच्या कालावधीविषयी सविस्तर प्रस्ताव मांडण्यात आला. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांना एकाचवेळी दंतोपचार तसेच अ‍ॅलोपॅथीचे उपचार करता येणार आहे.  ग्रामीण भागात  या दोन्ही शाखांचे डॉक्टर उपलब्ध व्हावेत यासाठी अभ्यासक्रमासाठीची ही योजना मांडण्यात आली आहे.

नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठानेही दंत वैद्यक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना आधुनिक वैद्यकाचा अभ्यासक्रम करण्याचा प्रस्तावाला मान्यता दिली आहे. तथापि दंतवैद्यक (बीडीएस) व अ‍ॅलोपॅथी (एमबीबीएस) यांचा सेतू देशपातळीवर साधण्याची आवश्यकता व्यक्त करून शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता व भारतीय दंत परिषदेचे सदस्य डॉ. मानसिंग पवार यांनी बीडीएसनंतरच्या तीन वर्षांच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाची रुपरेषा करून बैठकीत सादर केली. भारतीय दंत परिषदेने या प्रस्तावाला अंतिम रुप देण्यासाठी डॉ. अनिल नायक यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नियुक्त केली असून या समितीत ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’चा (एमसीआय) एक सदस्य आहे.

अभ्यासक्रमात काय असेल?

पाच हजार तासांचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम यासाठी तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी घ्यावयाच्या परीक्षेचे स्वरुप तसेच ही योजना तयार करण्यामागचे उद्दिष्ट यावर ‘डीसीआय’ च्या बैठकीत सखोल चर्चा झाली असून या नव्या अभ्यासक्रमाला मान्यता देण्यासाठी राष्ट्रीय कार्यशाळाही घेण्यात येणार आहे.या कार्यशाळेत डीसीआय, एमसीआय, वेगवेगळी कौन्सिल, दंत महाविद्यालयांचे प्राचार्य, दंत वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञ, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे प्रतिनिधी तसेच खासदारांचाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांना तीन वर्षे ग्रामीण भागात काम करावे लागणार आहे.

डॉक्टर कमतरतेवर उतारा..

भारतात आजघडीला ३०९ दंत वैद्यकीय महाविद्यालये असून एकूण जागा ३५ हजार एवढय़ा आहेत. राज्यात ३५ दंत वैद्यकीय महाविद्यालये असून साडेतीन हजार पदवीच्या जागा आहेत. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या अहवालानुसार देशात सहा लाख डॉक्टरांची कमतरता असून ‘बीडीएस’ अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांपैकी जवळपास निम्मे विद्याथ्र्यी हे ‘एमबीबीएस’ला प्रवेश न मिळाल्यामुळे दंत वैद्यकाकडे वळतात. या पाश्र्वभूमीवर दंतवैदक व अ‍ॅलोपथी या दोन्हींचे शिक्षण देणारा हा नवा सेतू आहे. ‘डीसीआय’चे अध्यक्ष डॉ. देवेंद्रू मुजुमदार यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

 

Story img Loader