लहान मुलांच्या टॅल्कम पावडरवर घालण्यात आलेल्या बंदीप्रकरणी अंतरिम दिलासा मागणाऱ्या ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ कंपनीच्या विनंतीला तीव्र विरोध करताना बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या उत्पादनासाठी भारतीयांचा गिनीपिग म्हणून वापर करीत असल्याचा आरोप अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी उच्च न्यायालयात केला. तसेच आपण घातलेली बंदी योग्य असल्याचे समर्थन केले.
पावडरच्या उत्पादनाची चाचणी केली गेली नसल्याचे आणि त्यात हानीकारक द्रव्ये वापरली जात असल्याचे उघड झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने कंपनीच्या मुलुंड येथील कारखान्यातील पावडरच्या उत्पादनावर बंदी घातली होती. त्या विरोधात कंपनीने न्यायालयात धाव घेतली असून कारखाना सुरू करण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे.
न्यायमूर्ती एस. जे. वझिफदार आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनाक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने युक्तिवाद करताना अ‍ॅड्. आशुतोष कुंभकोणी यांनी ही बंदी योग्य असल्याचा दावा केला. त्याचप्रमाणे बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या उत्पादनाच्या चाचणीसाठी भारतीयांचा गिनीपिग म्हणून वापर करीत असल्याचा आरोप करीत त्यांनी असे करणे थांबवावे, अशी मागणी केली. हा प्रकार अमेरिकेत उघडकीस आला असता तर कंपनीला कठोर परिणामांना सामोरे जावे लागले असते, असेही त्यांनी म्हटले. दुसरीकडे पावडरच्या उत्पादनामध्ये एलिथिन ऑक्साईडचा अजितबात वापर नसल्याचा दावा कंपनीतर्फे अ‍ॅड्. रफीक दादा यांनी केला व उत्पादनावरील बंदी उठवण्याची मागणी केली.
टॅल्कम पावडरमध्ये हानीकारक द्रव्ये वापरण्यात येत असून त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता उद्भवू शकते, असा दावा करीत अन्न व औषध प्रशासनाने कंपनीचा पावडरच्या उत्पादनासाठी परवाना मार्चमध्ये रद्द केला होता. त्यानंतर कंपनीने संबंधित यंत्रणेकडे धाव घेतली. परंतु ही बंदी योग्य असल्याचा निर्वाळा देण्यात आल्यावर कंपनीने न्यायालयात धाव घेतली.