इंडियन जिमखान्याच्या मैदानाकडे वक्रदृष्टी; उत्तुंग इमारतींना मार्ग मोकळा करण्यासाठी रस्ता रुंदीकरण?
वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याची रहिवाशांची कुरकुर.. आसपास उत्तुंग इमारती उभ्या करण्यात येत असलेला अडसर.. अशा नानाविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कायद्याच्या चौकटीत रस्तारेषेची निश्चिती करून किंगसर्कल परिसरात रस्ता रुंदीकरणाचा घाट घालण्यात आला असून त्यामध्ये मैदानाचाच लचका तोडण्यात आला आहे. या प्रकारामुळे क्रीडापटूंची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमधील इंडियन जिमखाना आक्रसू लागला असून त्यामुळे क्रीडापटूंमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी वृक्षवल्लींनी बहरलेला हा परिसर वृक्षतोडीमुळे बोडका झाला असून पुनरेपण करण्यात आलेले वृक्ष मरणपंथाला लागले आहेत.
मुंबईमधील किंगसर्कल रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेला इंडियन जिमखान्यालगतच्या रस्त्यावर चहुबाजूने इमारती उभ्या आहेत. त्यापैकी अनेक इमारती जुन्या आहेत. मैदानालगतच्या रस्ता अरुंद असला तरी तेथे वाहनांची फारशी वर्दळ नसते. जिमखान्याच्या आवारात वृक्षांमुळे हा परिसर निसर्गरम्यही वाटतो. मात्र जिमखान्याने जलतरण तलाव उभारण्याचा निर्णय घेतला आणि अचानक मुंबई महानगरपालिकेबरोबर केलेल्या भाडेपट्टय़ातील अटीनुसार लगतच्या रस्ता क्रमांक ५ वर रस्ता रेषा निश्चित करण्यात आली. त्याला नहानगरपालिकेची परवानगीही मिळाली. रस्ता क्रमांक ५ आणि त्यापुढील मार्गालगत एल आकारात मैदानाचा तब्बल २० फुटाने कमी करण्यात आला आहे. मैदान कमी करून या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले असून आता हा रस्ता नऊ मीटरहून अधिक मोठा होणार आहे. नऊ मीटर रस्त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यावर गगनचुंबी टॉवर बांधण्यास परवानगी देण्यात येत नाही; परंतु आता या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर लगतच्या इमारतींच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहण्यातील मोठा अडसर दूर होईल, असे येथील काही रहिवाशांचे म्हणणे आहे. जिमखान्याचे महत्त्व अलीकडे कमी होऊ लागले आहे, असे मत काही नागरिकांनी या वेळी बोलताना व्यक्त केले.
जिमखान्याचा इतिहास
जिमखान्याचा एकेकाळी क्रीडाजगतात मोठा दबदबा होता. या क्लबचा कांगा लीगमधील ‘अ’ गटातील संघाला मोठे मानाचे स्थान होते. फुटबॉल, लॉग टेनिस, बास्केटबॉल, बॅडमिंटन आदी क्रीडा प्रकारांतही या जिमखान्यात सराव करणाऱ्या क्रीडापटूंनी विविध पातळ्यांवर चमकदार कामगिरी केली आहे. विविध क्रीडा प्रकारांत चमकदार कामगिरी करणाऱ्या या जिमखान्यातील तब्बल १९ क्रीडापटूंनी छत्रपती पुरस्कार पटकावला आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या जिमखान्याला उतरती कळा लागली आहे.
पूर्वी भारतामध्ये बास्केटबॉल क्षेत्रात इंडियन जिमखान्याचा दबदबा होता. पूर्वी मैदानाच्या मध्यवर्ती भागात बास्केटबॉल कोर्ट होते. ते आता एका कोपऱ्यात हलवण्यात आले आहे. त्यामुळे बास्केटबॉल स्पर्धा भरविण्यात अडसर येऊ शकतो. मैदानातील मध्यवर्ती जागा लॉंग टेनिस कोर्टने घेतली आहे, तर धनदांडग्यांसाठी जलतरण तलावाचा घाट घालण्यात आला आहे.
– मुकुंद धस, जिमखान्याचे माजी सरचिटणीस
जिमखान्यात जलतरण तलावाची नवी सुविधा, दोन लाँग टेनिस कोर्ट आणि बास्केटबॉल कोर्ट नव्याने उभारण्यात येत आहेत. तसेच सध्याच्या इमारतीची दुरुस्तीही करण्यात येत आहे. यासाठी सर्व सभासदांची बैठक बोलावून परवानगी घेण्यात आली आहे. येथे स्क्वॉश कोर्ट उभारण्याचा विचार आहे. रस्ता रेषेनुसार मैदानात क्रीडा प्रकारासाठी वापरात नसलेला भाग सोडण्यात आला आहे. त्या बदल्यात मिळणाऱ्या चटईक्षेत्र निर्देशांकाचा वापर करून क्रीडा प्रकारासाठी सर्व सुविधा करण्यात येणार आहेत. कायद्याच्या चौकटीतच सर्व कामे करण्यात येत आहेत.
– गोविंद मुथुकुमार, जिमखान्याचे सरचिटणीस
वृक्ष मरणपंथाला
वृक्ष प्राधिकरणाने या मैदानातील आणि पदपथावरील १९ वृक्षांची कत्तल करण्यास आणि ३० वृक्षांचे पुनरेपण करण्यास अनुमती दिली, तर ५७ वृक्ष ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले. पालिकेकडून परवानगी मिळाल्यानंतर जिमखान्याने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले. परवानगीनुसार वृक्षांची कत्तल केली आणि काही वृक्षांचे मैदानातच पुनरेपण केले. पण काही दिवसांमध्ये पुनरेपण केलेले वृक्ष मरणपंथाला लागले आहेत.