‘ग्रंथाली’च्या परिसंवादात मान्यवरांचे मत
भारतीय संस्कृतीत नैतिकता ही केवळ लैंगिकतेभोवतीच, त्यातही प्रामुख्याने स्त्रीच्या चारित्र्याभोवतीच, फिरते. आपल्याकडे सार्वजनिक जागी थुंकणे किंवा कचरा टाकणे या गोष्टीकडे तेवढय़ा गांभीर्याने बघत नाहीत. मात्र स्त्री-पुरुष यांनी लग्नाआधी शारीरसंबंध ठेवले, तर ते नैतिकतेच्या दृष्टीने महान पातक असते. त्यामुळे ‘लिव्ह इन रिलेशन’ हा विवाहसंस्थेला पर्याय होण्यासाठी भारतीय मानसिकतेत आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे, असे मत ‘ग्रंथाली’तर्फे वाचक दिनानिमित्त आयोजित केलेल्या परिसंवादात सहभागी झालेल्या मान्यवरांनी व्यक्त केले. ‘विवाहाला लिव्ह इन रिलेशनशिपचा व्यवहार्य पर्याय!’ या विषयावर हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
ग्रंथाली प्रकाशन आणि कीर्ती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी संध्याकाळी झालेल्या या परिसंवादात मंगला आठलेकर, सतीश तांबे, अॅड. असीम सरोदे, कमलेश वालावालकर आणि शाल्मली पेठे सहभागी झाले होते. तर या परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रसन्न जोशी आणि नीरजा यांनी केले. या स्फोटक विषयावर जाहीर परिसंवाद आयोजित केल्याबद्दल सर्वच मान्यवरांनी ‘ग्रंथाली’चे आभार मानले.
आदीम काळात स्त्री-पुरुष हे लग्नाच्या बंधनात न अडकता शरीर व इतर संबंध ठेवत होते. पुरुषप्रधान संस्कृतीतून जन्मलेल्या लग्नसंस्थेने स्त्रीला नेहमीच दुय्यम वागणूक दिली आहे, असे प्रास्ताविक करत नीरजा यांनी विषयाला वाचा फोडली. आपला समाज विवाहबाह्य़ व विवाहपूर्व लैंगिक संबंधांकडे अजूनही साशंक नजरेने पाहतो, त्यामुळे ‘लिव्ह इन’ आपल्याकडे रूढ होण्यास वेळ लागेल, असे मत मंगला आठलेकर यांनी व्यक्त केले.
एक प्रयोग म्हणून ‘लिव्ह इन’या  शहरी संकल्पनेचा पर्याय चाचपून पाहायला नक्कीच आवडेल, असे शाल्मली पेठे यांनी सांगितले. तर अॅड. असीम सरोदे यांनी भारतात घटस्फोट मिळवण्याचे कायदे सुलभ झाल्यास विवाहसंस्था मजबूत होईल, असे सांगितले. वैचारिक प्रगल्भतेशिवाय ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ रुजणे शक्य नाही, असे मत सतीश तांबे यांनी तर कमलेश वालावालकर यांनी ‘लिव्ह इन’ला व्यक्तिश: विरोध दर्शवला.
यावेळी ग्रंथालीतर्फे डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. पी. एस. रामाणी आणि प्राचार्य व्ही. एन. मगरे यांच्या हस्ते नऊ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.