भारतात दहशतवादी हल्ला घडविण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनला आता लष्कर-ए-तय्यबा या पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनेची गरज उरलेली नाही. पाकिस्तानात जाऊन बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेऊन आलेले अनेक म्होरके हेच नव्याने भरती झालेल्या तरुणांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देत आहेत. इंडियन मुजाहिदिनमधील कुठलाही दहशतवादी हा बॉम्ब बनविण्यात वाकबगार असतो. ‘लष्कर-ए-तय्यबा’पेक्षाही आता इंडियन मुजाहिदिनचा मोठा धोका असल्याचे राज्य दहशतवादविरोधी विभागाचे म्हणणे आहे.
पुणे बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या इंडियन मुजाहिदिनच्या कातिल सिद्दिकी ऊर्फ साजन ऊर्फ जावेद ऊर्फ सलीम याची जबानी ‘एनआयए’ने नोंदविली आहे. त्याची प्रत ‘लोकसत्ता’कडे असून या जबानीतील माहितीवरून इंडियन मुजाहिद्दिनच्या कार्यपद्धतीची माहिती मिळाली आहे. या जबानीवर नजर टाकल्यास एक तरुण इंडियन मुजाहिद्दिनचा दहशतवादी कसा बनतो, याचा प्रवास सविस्तर कळतो. स्फोट घडविण्यासाठी प्रत्यक्ष तयारी करताना इंडियन मुजाहिद्दिनचे स्थानिक दहशतवादी कशी तयारी करतात, याची धक्कादायक माहितीही उघड झाली आहे. कातिल सिद्दिकीपाठोपाठ यासिनच्या जबानीतही तीच री ओढण्यात आल्यामुळे एनआयला मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाने सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे.
इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या यासिन भटकळला अटक झाली तरी असे अनेक म्होरके शांतपणे काम करत असल्याचे यासिननेच ‘एनआयए’ला सांगितले. पुण्यातील जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट घडविण्यात आल्यानंतर दिल्लीतील पहाडगंज येथील जर्मन बेकरीत गोळीबार करण्याचा प्रयत्न फसला होता, असे सिद्दिकीच्या जबानीवरून स्पष्ट होते. त्यावेळी सिद्दिकीलाच गोळी लागून तो जखमी झाला. अशा पद्धतीने पुन्हा हल्ला करण्याचा डावही आखला जात असल्याचे त्यावरून उघड होते. इंडियन मुजाहिदिन आज देशात कुठेही बॉम्बस्फोट घडवून आणू शकते, असे यासिनने जबानीत आधीच स्पष्ट केले आहे.
यासिनच्या अटकेनंतर पाटण्यात झालेल्या बॉम्बस्फोटाची तयारी फक्त २० दिवस आधी करण्यात आली होती. आताही इंडियन मुजाहिदिनचे म्होरके अशाच पद्धतीने तयारी करत असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा